गोडलवाही मदत केंद्र : निवडणुकीत शांतता पाळण्याचे दिले आश्वासन धानोरा : पोलीस उपविभाग पेंढरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र गोडलवाही हद्दीतील गावकऱ्यांनी १२ फेब्रुवारी रोजी गोडलवाही येथील पोलीस अधिकारी व सीआरपीएफचे अधिकारी यांच्यासमोर २३ भरमार रायफल व १३ बॅरल स्वत:हून जमा केल्या. पोलीस विभागातर्फे पेंढरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात गोडलवाही पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्या यासाठी हत्यार जमा करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत पदाबोरिया, गोडलवाही, गोडलवाही टोला, पावरवेल, हिपानेर, कुपानेर, तिरनपार या गावातील गावकऱ्यांनी आपल्याजवळ असलेल्या २३ भरमार रायफल व १३ बॅरल पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. गोडलवाही पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सरडे, गजानन गोटे, केशव किशोरकुमार खाडे, सीआरपीएफ ११३ बटालियनचे असिस्टंट कमांडंट विकास कुंभार आदी अधिकाऱ्यांसमोर हत्यारे जमा करण्यात आली. हत्यारे जमा केलेल्या नागरिकांचे पोलीस विभागाने स्वागत केले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी गावकऱ्यांना केले. यावेळी गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. इतरही नागरिकांना हत्यार जमा करण्यासाठी सांगू, असे आश्वासन गावकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)
२३ भरमार बंदुका जमा
By admin | Published: February 13, 2017 1:55 AM