अहेरी उपजिल्हा रूग्णालय : संपूर्ण वॉर्ड कॅमेऱ्यात होणार नजरबंद प्रतीक मुधोळकर अहेरी अहेरी उपविभागाच्या आरोग्याची जबाबदारी पेलणाऱ्या अहेरी उपजिल्हा रूग्णालय आरोग्य विभागाने सुमारे २३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे रूग्णालयाला एक प्रकारचे सुरक्षा कवच प्राप्त झाले असून रूग्णालयातील प्रत्येक बाबीची नोंद आता सीसीटीव्ही कॅमेरात नजरबंद होणार आहे. अहेरी उपविभागातील अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या पाच तालुक्यांमधील बहुतांश रूग्ण अहेरी उपजिल्हा रूग्णालयातच सर्वप्रथम दाखल होतात. अर्ध्या जिल्ह्याच्या लोकसंख्येचा भार सदर रूग्णालय वाहत आहे. त्यामुळे हे रूग्णालय रूग्ण व नातेवाइकांच्या गर्दीने नेहमीच गजबजले राहते. दिवसेंदिवस रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर होणारे जीवघेणी हल्ले, बाचाबाची, धक्काबुक्की, नवजात बाळाची चोरी होणे, रूग्णालयातून औषधांची काळाबाजारी, कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी वेळेवर न पोहोचणे, गैरहजर असणे, एखाद्या ठिकाणी आग लागणे, लाच घेणे, धूम्रपान करणे यासारखे प्रकार राज्यभरातील शासकीय तसेच खासगी रूग्णालयांमध्ये वाढत चालले आहेत. यापासून अहेरी रूग्णालय सुध्दा अपवाद नाही. या सर्व अवैध बाबींवर नजर ठेवता यावी, यासाठी आरोग्य विभागाने अहेरी उपजिल्हा रूग्णालयात महत्त्वाच्या ठिकाणी नुकतेच २३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या संपूर्ण कॅमेरांचे चित्रीकरण वैद्यकीय अधीक्षक यांच्या कक्षात केले जाणार आहे. वैद्यकीय कक्षात मोठा टीव्ही बसविण्यात आला आहे. त्यामुळे रूग्णालयातील प्रत्येक घडामोडीवर वैद्यकीय अधीक्षकांचे लक्ष राहण्यास फार मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर रूग्णालयातील अवैध प्रकारांवर यामुळे आळा बसण्यास आपोआप मदत होणार आहे. प्रत्येक कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये काम करणार असल्याने त्यांच्यावरही नियंत्रण राहण्यास फार मोठी मदत होणार आहे. या कॅमेरामुळे अहेरी रूग्णालयाला एक प्रकारे सुरक्षेचे कवच प्राप्त झाले आहे. या ठिकाणी लावले सीसीटीव्ही कॅमेरे अहेरी उपजिल्हा रूग्णालयाचे दोन्ही मुख्य प्रवेशद्वार, शस्त्रक्रिया कक्ष, महिला व पुरूष वार्ड, वऱ्हांडा, वैद्यकीय अधीक्षक कक्ष, डॉक्टर चेंबर, ओपीडी वार्ड, औषधी स्टोअर रूम, रक्ततपासणी प्रयोगशाळा, लेबर वार्ड आदी मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रूग्णालयातून औषधांची चोरी व इतरही लहान मोठ्या चोरीच्या घटना घडत होत्या. मात्र औषधी स्टोअर रूममध्ये कॅमेरा लावण्यात आल्याने औषधांचा चोरीवर आळा बसण्यास मदत होणार आहे. काही वार्डांमध्ये मात्र अजूनही सीसीटीव्ही लागले नसून त्या ठिकाणी सुध्दा सीसीटीव्ही लावण्याची मागणी आहे.
२३ सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच
By admin | Published: January 06, 2017 1:37 AM