सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक दुसऱ्या टप्प्यात २० जानेवारी रोजी पार पडणार आहे. या काळात दारूची मोठ्या प्रमाणात मागणी राहत असून विक्रेत्यांचे सुगीचे दिवस असतात. त्यामुळे अमरावती येथील दारू विक्रेत्यांनी परिसरातील गावागावात दारू विक्री करीत अधिकचे पैसे कमविण्याच्या उद्देशाने गुळाचा सडवा टाकला होता. सध्या गावागावात दारूमुक्त निवडणुकीचा निर्धार केला जात असतानाच दुसरीकडे दारू विक्रेते मोठ्या प्रमाणात दारू विक्री करण्याच्या तयारीत आहेत. गावात व परिसरात दारूमुक्त निवडणूक पार पडावी यासाठी दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणे अधिक महत्त्वाचे झाले होते. गावातील दारू विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तहसील कार्यालय, पोलीस विभाग व मुक्तिपथने संयुक्तरीत्या कारवाई करीत १० दारू विक्रेत्यांच्या घराची तपासणी केली. दरम्यान, एकूण २४ ड्रम गुळाचा सडवा व २५ लिटर दारू असा एकूण १ लाख ४९ हजाराचा मुद्देमाल आढळून आला. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत आठ दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई नायब तहसीलदार अमित सय्यद, पोलीस निरीक्षक अजय अहिरकर, बीट अंमलदार बोरघळे, अमरावतीचे तलाठी पी. आर. शेरकी, कोतवाल भंडारी, विक्रम जाळी यांच्यासह पोलीस कर्मचारी व मुक्तिपथ चमूने केली आहे.
२४ ड्रम गुळाचा सडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:36 AM