विजय भटकर मुख्य अतिथी : गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा चतुर्थ दीक्षांत समारंभ १३ फेब्रुवारी रोजी सोमवारला सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर हे दीक्षांत भाषण करणार असून विशेष अतिथी म्हणून मेघालयचे माजी राज्यपाल तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी रणजित मुशाहरी उपस्थित राहणार आहेत. या समारंभाची जय्यत तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात आली आहे. सदर दीक्षांत समारंभात हिवाळी २०१५ व उन्हाळी २०१६ मध्ये पदवी व पदव्युत्तर व पदविका परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण १२ हजार ३५२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या निर्देशानुसार २५३ गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र व दानदात्यांकडून विविध अभ्यासक्रमांना घोषीत करण्यात आलेले २४ सुवर्ण पदके उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर उपस्थित राहणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
२४ विद्यार्थ्यांचा होणार सन्मान
By admin | Published: February 13, 2017 1:51 AM