शासनाकडून मान्यता : स्वच्छ भारत मिशनमधून वगळलेगडचिरोली : गावे गोदरीमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने गतवर्षीपासून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियान सुरू केले. या अभियानातून निवड केलेल्या गावांमध्ये वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मात्र स्वच्छ भारत मिशन मधून अनेक गरजू व पात्र गावांना वगळण्यात आले. जिल्ह्यातील अशा २४ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक शौचालयाचे काम करण्यात येणार आहे. या संदर्भात शासनाकडून मान्यता मिळाली आहे. मजुरांच्या हाताला १०० दिवसांचे काम देणे हे मुख्य उद्दिष्ट रोजगार हमी योजनेचे आहे. मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवडीपासून वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासारखे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. शासनाने गतवर्षी सन २०१५-१६ पासून जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाला वैयक्तिक शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट दिले. सन २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षासाठी शासनाने जि.प.च्या नरेगा विभागाला २४ गावात एकूण ६ हजार ८७६ शौचालयाचे उद्दिष्ट दिले. यापैकी आतापर्यंत नरेगा विभागामार्फत जवळपास ११०० शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. उर्वरित शौचालयाचे काम सुरू आहे. सन २०१६-१७ या वर्षात नरेगा विभागाला २४ गावात एकूण २ हजार ४३४ वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करावयाचे आहे. पंचायत समिती स्तरावरून गावांची निवड करून आराखडा तयार करण्यात आला. सदर आराखडा जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. या आराखड्याला मंजुरी मिळाली असल्याने आता शौचालयाचे बांधकाम होणार आहे. यामध्ये एपीएल व बीपीएलधारक लाभार्थ्यांचा समावेश असून त्यांना प्रती शौचालय १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)असे आहे यंदाच्या बांधकामाचे नियोजननरेगातून २ हजार ४३४ वैयक्तिक शौचालयाचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे ५७०, किन्हाळा २५०, पिंपळगाव ५६, कसारी ६९, चोप ४२५, तसेच आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे ८९, सुकाळा १८, कोरेगाव (रांगी) ५२, चामोर्शी माल २७१, वघाळा १३४, गडचिरोली तालुक्यातील मारोडा येथे १५७, कोरची तालुक्यातील टेमली येथे १४५ व धानोरा तालुक्यातील चिंगली गावात १९८ शौचालयाचे बांधकाम होणार आहे. २४ मधील उर्वरित गावांमध्ये गतवर्षीपासून वैयक्तिक शौचालयाचे काम नरेगातून सुरू आहे.
२४ गावांत नरेगातून होणार शौचालय
By admin | Published: July 06, 2016 1:37 AM