वर्ग २ व ८ ची चाचणी : ९० हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षादिगांबर जवादे गडचिरोलीविद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागामार्फत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या भाषा व गणित या विषयांची आॅक्टोबर महिन्यात चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील २४.८३ टक्के विद्यार्थी भाषा विषयात व २४.३५ टक्के विद्यार्थी गणित या विषयात अप्रगत असल्याचे आढळून आले असून या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घेण्यात यावेत, असे निर्देश शिक्षण विभागाने सर्वच शाळांना दिले आहेत.जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुमार असल्याने अनेक पालकवर्ग या शाळांमध्ये आपला पाल्य दाखल करण्यास तयार होत नाही. त्यामुळे या शाळांची विद्यार्थी संख्या घटत चालली आहे. शिक्षणावर शासन कोट्यवधींचा खर्च करीत असला तरी विद्यार्थ्यांची प्रगती मात्र समाधानकारक नसल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती नेमकी किती झाली आहे, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने दुसरी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची चाचणी घेतली होती. शिक्षण विभागाकडे मुलचेरा तालुका वगळता उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या चाचणीला जिल्हाभरातून ९० हजार विद्यार्थी चाचणीला बसले होते. त्यापैकी भाषा विषयात ६७ हजार ७५९ विद्यार्थी प्रगत व २२ हजार ३६३ विद्यार्थी अप्रगत आढळून आले आहेत. याची टक्केवारी २४.८३ एवढी आहे. गणित विषयात ७३ हजार ४५२ विद्यार्थी प्रगत आढळून आले असून २१ हजार ९३४ विद्यार्थी अप्रगत आहेत. याचाच अर्थ जिल्हाभरातील २५ टक्के विद्यार्थी अजूनही मागे आहेत. हा आकडा शिक्षण विभागाचा आहे. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा जास्त विद्यार्थी अप्रगत असण्याची शक्यता आहे.तीन महिने उलटूनही मुलचेराचा अहवाल अप्राप्तविद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबतची चाचणी आॅक्टोबर महिन्यात घेण्यात आली होती. सुरूवातीला याबाबतचा अहवाल शासनाने आॅनलाईन पध्दतीने मागितला होता. मात्र काही पंचायत समितींनी हा अहवालच सादर केला नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हास्तरावर लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने १५ दिवसांपूर्वी दिले. जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितींनी चाचणीचा अहवाल सादर केला आहे. मात्र मुलचेरा पंचायत समितीने अजूनही सदर अहवाल सादर केला नसल्याने शिक्षण विभागातील सावळा गोंधळ यामुळे पुढे आला आहे. या एका पंचायत समितीचा अहवाल प्राप्त न झाल्याने बाराही पंचायत समितीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यास अडचण जात आहे. विशेष वर्गांचे आयोजनजे विद्यार्थी अप्रगत आढळून आले आहेत. अशा विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत. या विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षकांनी विशेष वर्ग घ्यावेत व कोणत्याही परिस्थितीत या विद्यार्थ्यांना प्रगत करण्यात यावेत. अन्यथा यासाठी संबंधित शिक्षकाला जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे शिक्षकही कामाला लागले आहेत. या विद्यार्थ्यांची पुन्हा चाचणी घेतली जाणार आहे.
२५% विद्यार्थी अप्रगत
By admin | Published: February 07, 2016 1:55 AM