कोरोनाची दहशत वाढल्याने लॉकडाऊन, संचारबंदी असे अनेक उपाय करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने डोके वर काढल्याने कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पहिल्या रांगेतील कर्मचाऱ्यांना लस दिली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि आजार असलेल्या व नसलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देणे सुरू केले होते. मात्र ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस झाल्यानंतर दुसऱ्या डोससाठी ताटकळत राहावे लागले.
ज्येष्ठ नागरिक रोज ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधत होते; मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडत होती. अखेर प्रशासनाने २३ एप्रिलला तालुक्याला २५०० लसींचा पुरवठा केला. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
(बॉक्स)
नऊ केंद्रांवर होणार लसीकरण
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, शहरातील जिल्हा परिषद नूतन शाळा, भेंडाळा, घोट, आमगाव महाल, रेगडी, कुनघाडा, येणापूर, कंसोबा मार्कडा या नऊ केंद्रांवर लस उपलब्ध करून सोमवारपासून लसीकरण केले जाणार आहे. चामोर्शी हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण १७ प्रभागांत विभागले गेले आहे. नगरासाठी केवळ दोन लसीकरण केंद्रे असून ती अपुरे असल्याने लसीकरण केंद्रांची संख्या नगरात वाढविण्यात यावी, अशीही मागणी होत आहे. चामोर्शी नगरात आणखी लसीकरण केंद्र वाढविण्याच्या दृष्टीने वरिष्ठांशी चर्चा करून प्रयत्न करणार असल्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. भूषण लायबर यांनी सांगितले.