लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची जडणघडण व शैक्षणिक विकास जिल्हा परिषदेच्या शाळांमधून होत असतो. मात्र बहुतांश जि.प. शाळांमध्ये विविध प्रकारच्या भौतिक सुविधांचा अभाव आहे. जिल्ह्यातील तब्बल २६९ शाळांना अद्यापही संरक्षण भिंतही नाही. त्यामुळे मोकाट जनावरांचा संबंधित शाळांमध्ये वावर असतो.शिक्षण विभागाच्या धोरणानुसार भौतिक सुविधांचे १० घटक आहेत. सदर १० घटकानुसार प्रत्येक शाळेत भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. बहुतांश शाळांमध्ये या भौतिक सुविधांचा अभाव असल्याने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात १ हजार ५४८ शाळा आहेत. सदर शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. या शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थी आहेत. मात्र भौतिक सुविधांची वाणवा असल्याने याचा परिणाम काही प्रमाणात गुणवत्तेवर होत आहे. १ हजार ५४८ शाळांपैकी १ हजार २७९ शाळांना संरक्षण भिंत आहे. २६९ शाळांना संरक्षण भिंत उभारण्यात आल्या नाही. संरक्षण भिंत असलेल्या शाळांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ९४, आरमोरी तालुक्यातील ९१, कुरखेडा १२०, धानोरा १५१, चामोर्शी १६४, अहेरी १३७, एटापल्ली १६९, सिरोंचा ११५, मुलचेरा ६१, कोरची ९७, भामरागड ५६ व देसाईगंज तालुक्यात ३४ शाळांचा समावेश आहे.सन २०१८-१९ हे शैक्षणिक सत्र सुरू होण्यास आठवडाभराचा कालावधी शिल्लक उरला आहे. असे असतानाही शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्याने प्रशासनातर्फे शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यात आल्या नाही. भौतिक सुविधा नसलेल्या शाळांमध्ये या सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद प्रशासनाने केली होती. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने भौतिक सुविधा निर्माण करण्याची कार्यवाही तुर्तास थंडबस्त्यात आहे.१ हजार ५४८ शाळांपैकी १ हजार ४७० शाळांमध्ये मुलींसाठी प्रसाधनगृहाची सुविधा आहे. अद्यापही तब्बल ७८ शाळांमध्ये मुलींसाठी प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे मुलींना अडचण येत आहे. १ हजार ४५६ शाळांमध्ये मुलांसाठी प्रसाधनगृह आहे, तर ९८ शाळांमध्ये मुलांसाठी प्रसाधनगृह नाही. सर्वच १ हजार ५४८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच शाळा इमारत उपलब्ध असल्याची माहिती जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत मागील दोन वर्षांत बऱ्याच शाळांमध्ये आवश्यक त्या भौतिक सुविधा करण्यात आल्या.७०४ शाळांमध्ये क्रीडांगणाचा अभावजिल्हा परिषदेच्या १ हजार ५४८ प्राथमिक व उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांपैकी एकूण ७०४ शाळांमध्ये अद्यापही क्रीडांगणाची व्यवस्था नाही. त्यामुळे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शालेय खेळांचा व क्रीडा स्पर्धांचा सराव करण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. क्रीडांगणाचा अभाव असलेल्या शाळेतील विद्यार्थी गावालगतच्या मोकळ्या जागेत तसेच शेतशिवारात खेळाचा सराव करीत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. क्रीडांगणाअभावी विद्यार्थ्यांच्या क्रीडा विषयक विकासावर परिणाम होत आहे. सातत्याने मागणी करूनही क्रीडांगणाची निर्मिती करण्यात आली नाही.६२४ मुख्याध्यापक बसतात वर्गखोलीत१ हजार ५४८ शाळांपैकी ६२४ शाळांमधील मुख्याध्यापकांना बसून विविध शैक्षणिक व कार्यालयीन कामे करण्यासाठी स्वतंत्र कक्ष नाही. त्यामुळे या शाळांमधील शिक्षक वर्गखोलीत बसून विद्यार्थ्यांसमोरच कार्यालयीन कामे करीत असल्याचे दिसून येतात.
२६९ शाळा संरक्षण भिंतीविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 1:23 AM
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची जडणघडण व शैक्षणिक विकास जिल्हा परिषदेच्या शाळांमधून होत असतो. मात्र बहुतांश जि.प. शाळांमध्ये विविध प्रकारच्या भौतिक सुविधांचा अभाव आहे.
ठळक मुद्देशासनाकडून निधी मिळेना : जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधांची आबाळ