लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कृषिपंपधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना' राज्यात अमलात आणलेली आहे. जिल्ह्यातील ७.५ एचपी (अश्वशक्ती) क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. जिल्ह्यातील २६ हजार ५०० वर कृषिपंपधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना' राबविली जात आहे. यामुळे कृषिपंप ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळ, पूर यासह विविध संकटांचा सामना करावा लागतो. हे संकट झेलताना शेतकऱ्यांना कृषिपंपाचे बिल भरण्यासाठी अडचणी येतात. परिणामी बिल थकीत राहते. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन शासनातर्फे ७.५ अश्वशक्तीपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे.
हे शेतकरी आहेत पात्र...७.५ एच.पी.पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक मोफत वीज योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.चक्राकार पद्धतीने कृषिपंपांना विद्युत पुरवठा केला जाणार आहे.
असा आहे योजनेचा कालावधीमुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ५ वर्षांसाठी राबविली जात आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत या योजनेचा कालावधी आहे. मात्र, योजना सुरू होऊन ३ वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात येणार आहे.
२४,५२१ शेतकऱ्यांना देयक माफीमुळे दिलासाराज्य शासनाने कृषिपंपधारकांचे वीजबिल माफ करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. यानुसार जिल्ह्यातील २४ हजार ५२१ शेतकऱ्यांचे १२० कोटी रुपयांचे वीजबिल माफ होणार आहे