अतिवृष्टीनंतरची स्थिती : पूरग्रस्त गावांमध्ये आधीच अन्नधान्य साठ्याची सोय लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाचा अद्याप थांगपत्ता नाही. मात्र पावसाळ्यातील दरवर्षीची संभाव्य परिस्थिती पाहता आपत्ती निवारणासाठी प्रशासनाने आतापासून योग्य तरतूद केली आहे. जिल्ह्यात संवेदनशील क्षेत्रातील २६४ गावांचा संपर्क अतिवृष्टीनंतर तुटतो. त्या ठिकाणी शासनाच्या स्वस्त धान्य योजनेअंतर्गत धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी १७०० मीमी पाऊस पडते. गडचिरोली जिल्ह्याचा ८० टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. त्याचबरोबर नद्यांची संख्या सुद्धा अधिक आहे. नदीच्या काठावर अनेक गावे वसलेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान पूरपरिस्थितीचा सामना या गावांना करावा लागतो. अनेक गावांना जाण्यासाठी अजूनही रस्ते नाही. त्याचबरोबर नदी, नाल्यावर उंच पूल बांधण्यात आले नाही. परिणामी पावसाळ्यात सुमारे चार महिने या गावांचा संपर्क तुटतो. या गावात राशनचे धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. हा अनुभव येथील जिल्हा प्रशासनाला असल्याने चार महिन्यांपूर्वीचे धान्य अगोदरच पोहोचता करून दिले जाते. विशेषकरून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, धानोरा, कोरची, अहेरी या तालुक्यांमधील नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त भागातील गावांचा संपर्क तुटण्याची समस्या भेडसावते. भामरागडसमोरच्या पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान संपूर्ण भामरागड तालुक्याचाच संपर्क तुटतो. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपत्ती व्यवस्थापनाला पावसाळ्याच्या दिवसात विशेष जागृत राहून खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन विभागाने योग्य नियोजन करून उपाययोजना केल्या आहेत. २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोगांना नियंत्रित करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर औषधीसाठा व साथ नियंत्रणसामग्रीची कीट उपलब्ध करण्यात आली आहे. ३१ आॅक्टोबरपर्यंत दिवसाचे २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. गेल्यावर्षीच्या बाधित क्षेत्रासाठी अद्याप मदत नाही गेल्यावर्षी (२०१६) जिल्ह्यातील २४७३ हेक्टर कृषी क्षेत्राला अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला होता. परंतू अद्याप शासनाकडून त्यासाठी कोणतीही मदत प्राप्त झालेली नाही. बाधित क्षेत्रात गडचिरोली तालुक्यातील १३.६५ हेक्टर, आरमोरी तालुक्यातील ६१.५८ हेक्टर, देसाईगंज तालुक्यातील १५.९३ हेक्टर, कुरखेडा तालुक्यातील ३९८.०१ हेक्टर, चामोर्शी तालुक्यातील १९४४.३३ हेक्टर, मुलचेरा तालुक्यातील ३७.६८ हेक्टर आणि एटापल्ली तालुक्यातील ३.८५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. शासनाकडून मदत मिळावी यासाठी आपद्ग्रस्तांनी अनेकवेळा अधिकारी व शासनाला निवेदन दिले आहे. मात्र वर्ष उलटूनही मदतीची प्रतीक्षा कायम आहे.
२६४ गावांचा संपर्क तुटणार
By admin | Published: June 25, 2017 1:24 AM