एलईडी टीव्ही : बँक व आदिवासी विकास विभागाची मदतदिगांबर जवादे । लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास विभाग व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या आर्थिक मदतीतून जिल्हाभरातील २७ अंगणवाड्या स्मार्ट बनणार आहेत. यापैकी पाच अंगणवाड्यांमध्ये बँकेने बालकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. १ ते ६ वर्षापर्यंतच्या बालकांचे पालनपोषण, आरोग्य व शिक्षण तसेच गरोदर मातांचे पोषण आदी महत्त्वाचे कार्य अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून केली जातात. ‘गाव तिथे अंगणवाडी’ या संकल्पनेनुसार जिल्हाभरात प्रत्येक गावात अंगणवाडी निर्माण करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ हजार २८९ अंगणवाड्या आहेत. यामध्ये १ हजार ७७१ मुख्य अंगणवाड्या तर ५१८ मिनी अंगणवाड्या आहेत. मात्र यातील बहुतांश अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. शासनाकडून प्राप्त झालेला पोषण आहार शिजवून खाऊ घालण्याचे काम केवळ केले जाते. जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक तालुक्यातील दोन या प्रमाणे ११ तालुक्यातील २२ अंगणवाड्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये देसाईगंज हा तालुका वगळण्यात आला आहे. प्रत्येक अंगणवाडीसाठी १ लाख ६७ हजार ५०० रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सदर निधी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडे वळता करण्यात आला आहे. या निधीतून अंगणवाडी परिसरात सौरऊर्जा संच बसविला जाणार आहे. या संचामुळे अंगणवाडीतील पंखा व बल्ब वीज पुरवठ्याशिवाय सुरू राहणार आहे. एलईडी टीव्ही, यूएसबी पोर्ट, पेनड्राईव्ह उपलब्ध करून दिला जाणार आहे. अंगणवाडीच्या आकारानुसार मुलांकरिता टेबल व खुर्च्या, खेळण्याचे व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रत्येक अंगणवाडीमध्ये वॉटर प्युरीफायर, इलेक्ट्रानिक्स वजन काटा आदी साहित्य उपलब्ध होतील. या सर्व साहित्यांमध्ये अंगणवाडीचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. अंगणवाडीमध्ये खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध राहत नसल्याने विद्यार्थी अंगणवाडीमध्ये येण्यास तयार होत नव्हते. मात्र ही सर्व साहित्य उपलब्ध झाल्यास बालकांची उपस्थिती वाढेल. त्याचबरोबर त्याचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार आहे. पाच अंगणवाड्या व पाच शाळांचा कायापालटजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वत:च्या निधीतून भामरागड तालुक्यातील मल्लमपोडूर, भामरागड अंगणवाडी क्रमांक-२, एटापल्ली तालुक्यातील तोडसा, गेदा येथील अंगणवाडी क्रमांक-१ व कोरची तालुक्यातील कोचीनारा येथील अंगणवाड्यांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये सौर विद्युत संच, वॉटर प्युरीफायर, खेळणी उपलब्ध करून दिली आहेत. अंगणवाडीचे सुशोभिकरण, रंगरंगोटी करण्यात आली आहे. अंगणवाड्यासोबतच बँकेने भामरागड तालुक्यातील लाहेरी, मन्नेराजाराम व ताडगाव तसेच एटापल्ली तालुक्यातील कसनसूर, दोलंदा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना डिजिटल साहित्य उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये प्रत्येक शाळेला प्रत्येकी चार अॅन्ड्राईड टीव्ही स्टिक व चार एलईडी टीव्ही उपलब्ध करून दिले आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना डिजीटल साधनांचा वापर करून अध्ययन करता येणार आहे.
२७ अंगणवाड्या स्मार्ट
By admin | Published: June 02, 2017 12:54 AM