संजय तिपाले/गडचिरोली: दोन हजार रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबर २०२३ नंतर चलनातून बाद होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांकडून या नोटा बदलण्याचे काम पध्दतशीरपणे सुरु आहे. अशाच पध्दतीने दोन हजार रुपयांच्या नोटांची १२ लाखांवर रोकड व इतर मिळून एकूण २७ लाख ६२ हजार रुपयांच्या रोकडसह दोन संशयितांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई ५ जुलै रोजी दुपारी वाजता अहेरी येथे नाकाबंदी दरम्यान करण्यात आली. दोन्ही संशयित आरोपी हे शासनाने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी निगडीत असल्याची माहिती आहे.
नामे रोहीत मंगु कोरसा (वय २४, रा. धोंडूर ता. एटापल्ली जि. गडचिरोली), बिप्लव गितीश सिकदार (वय २४ , रा. पानावर जि. कांकेर ,छत्तीसगड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.३० सप्टेंबर २०२३ नंतर २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. त्यामुळे नागरिक सध्या २ हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी बेकायदेशीर रित्या जमवलेले पैसे ते लोकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणाहून बदलवून घेत असल्याचे समोर आलेले आहे. काही ठिकाणी अशा रक्कमा जप्त केल्या आहेत.
५ जुलै रोजी दुपारी दोन वाजता अहेरी येथे नाकाबंदी दरम्यान विशेष अभियान पथकांच्या जवानांची दुचाकीवरुन निघालेल्या दोन संशयितांना पकडले. त्यांच्याजवळ २ हजार रुपयांच्या १२ लाख १४ हजार रुपयांच्या ६०७ नोटा , पाचशे रुपयांच्या १५ लाख ३६ हजार किमतीच्या ३०७२ नोटा व १०० रुपयांच्या १० हजार ६०० रुपयांच्या १०६ नोटा अशी एकूण २७ लाख ६२ हजार रुपयांची रोकड आढळून आली.हे दोन्ही संशयित आरोपी हे सरकारने बंदीघातलेल्या माओवादी संघटनेसाठी काम करतात, २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी त्यांनी ही रक्कम जवळ बाळगल्याचे उघड झाले. त्यानुसार गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे.
तेंदूपानांच्या ठेकेदारांकडून खंडणी उकळल्याचा अंदाजआताच तेंदूपानांचा हंगाम झाला. या हंगामात तेंदूपानांच्या ठेकेदारांना नक्षलवादी ब्लॅकमेल करुन खंडणी वसूल करतात. हा पैसा तशाच स्वरुपाचा असावा, असा पोलिसांचा कयास आहे. या पैशातूनच देशविघातक कारवाया नक्षली करत असतात. दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा इतर बाबींसाठी अशा लोकांना कोणीही थारा देऊ नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.