(मावळते वर्ष)
मनोज ताजने
गडचिरोली : गेल्या चार दशकांपासून गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेल्या नक्षल चळवळीला अलीकडच्या काही वर्षात उतरती कळा लागली आहे. २०२० या वर्षातही नक्षलविरोधी अभियानाने एक पाऊल पुढे टाकत चांगली कामगिरी केली. या वर्षात २९ नक्षलवाद्यांना अटक झाली. याशिवाय विविध चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले, तर ३ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे नांगी टाकत आत्मसमर्पण केले.
२०१९ च्या तुलनेत यावर्षी नक्षलवादी हिंसक कारवाया करण्यात फारसे यशस्वी झाले नसल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे नक्षलवाद्यांनी काही ठिकाणी घातपाती कारवाया घडवून आणल्या, पण यावर्षी हिंसक कारवाया घडवून आणण्यात त्यांना यश आले नाही. चकमकीत ठार झालेल्या १० नक्षलवाद्यांपैकी २ जणांचे मृतदेह सोबत नेऊन नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. मात्र पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या नक्षल शिबिरातील साहित्य व त्यांच्या नोंदीवरून पोलिसांनी एकूण मृत नक्षलवाद्यांची खात्री केली. एकूणच गेल्यावर्षीच्या तुलनेत नक्षलविरोधी अभियानाची कामगिरी यावर्षी सरस ठरल्याचे दिसून येते.
यावर्षी कोरोनाकाळामुळे पोलिसांना नक्षलग्रस्त गावांमध्ये जाऊन जनसंपर्क सभा, कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही. तरीही कोरोनाचे नियम पाळत ७ ठिकाणी असे कार्यक्रम घेतले. तसेच १०५ जनजागरण मेळावे घेऊन पोलीस आणि नागरिकांमधील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला.
(बॉक्स)
गेल्यावर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
- २०१९ मध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये २५ चकमकी आणि १२ जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. याशिवाय भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस शहीद तर २७ जखमी झाले होते. पोलीस खबरी असल्याच्या संशयातून १७ नागरिकांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. या वर्षात ३४ नक्षलवादी आणि नक्षल नेत्यांनी आत्मसमर्पण केले.
- यावर्षी (२०२० मध्ये) १७ चकमकी आणि ४ ठिकाणी जाळपोळ झाल्या. तसेच नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात ३ पोलीस जवान शहीद होऊन १३ जखमी झाले. पोलीस खबरी असल्याच्या संशयातून ५ नागरिकांची हत्या झाली. यावर्षी आत्मसमर्पणाचे प्रमाण मात्र कमी आहे. केवळ ३ जहाल नक्षलवादी आत्मसमर्पणासाठी पुढे आले.