वनरक्षक पदाची भरती : पेसा क्षेत्रातील गावेगडचिरोली : गडचिरोली वनवृत्ताच्या वतीने अनुसूचित क्षेत्रातील (पेसांतर्गत) वनरक्षकाच्या ६६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर भरतीसाठी ६ हजार ४५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शारीरिक पात्रता तपासणी व धावण्याच्या चाळणी परीक्षेत २ हजार १२७ पुरूष व १ हजार ८३६ महिला अशा एकूण ३ हजार ९६३ उमेदवार ३० मिनिटात अंतर पार करून शारीरिक चाळणी परीक्षेत पात्र ठरले आहेत, अशी माहिती प्रादेशिक निवड समितीचे सदस्य सचिव तथा गडचिरोलीच्या उपवनसंरक्षकांनी लोकमतला दिली आहे.पुरूष उमेदवारांसाठी ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शारीरिक पात्रता तपासणी व पाच किमी धावण्याची चाळणी चाचणी घेण्यात आली. महिला उमेदवारांसाठी ९ ते १० नोव्हेंबरदरम्यान शारीरिक पात्रता व धावण्याची चाळणी चाचणी घेण्यात आली. या चाचणीला ३ हजार ६७ पुरूष व १ हजार ९२२ महिला उमेदवार उपस्थित झाले. यापैकी २ हजार ७२७ पुरूष व १ हजार ८९२ महिला उमेदवार शारीरिक दृष्ट्या पात्र ठरले. यामध्ये २ हजार १२७ पुरूष व १ हजार ८३६ महिला अशा एकूण ३ हजार ९६३ उमेदवारांनी ३० मिनिटात अंतर पार केले व सदर उमेदवार शारीरिक क्षमता व धावण्याच्या चाळणीत पात्र ठरले.६६९ पुरूष व ५६ महिला असे एकूण ७२५ उमेदवार शारीरिक क्षमता व धावण्याच्या चाळणी चाचणीत अपात्र ठरले आहेत. सदर पात्र व अपात्र उमेदवारांची यादी उपवनसंरक्षक गडचिरोली वन विभाग यांच्या कार्यालयीन नोटीस बोर्डावर १२ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. यावर कुणाला आक्षेप घ्यायचा असल्यास त्यांनी १७ नोव्हेंबरपर्यंत समितीकडे अर्ज करावेत. (प्रतिनिधी)
शारीरिक चाचणीत ३ हजार ९६३ उमेदवार पात्र
By admin | Published: November 13, 2016 2:05 AM