गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे ३५ हजार कोटी रुपयांच्या स्टील निर्मिती प्रकल्पातून आठ दशलक्ष टन, तर अहेरीच्या वडलापेठमधील प्रकल्पातून चार दशलक्ष टन स्टील निर्मिती होईल. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर देशातील ३० टक्के स्टील निर्मिती गडचिरोलीतून होईल. याद्वारे हा जिल्हा ‘स्टील सिटी ऑफ इंडिया’ म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सुरजागड इस्पात प्रा.लि.च्या १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या स्टील निर्मिती प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी वडलापेठ (ता. अहेरी) येथे झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, पार्थ पवार, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, लाॅईड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन आणि सुरजागड इस्पातचे प्रमुख सुनील जोशी उपस्थित होते.
गडचिरोलीत सुरू होणाऱ्या उद्योगात ८० टक्के रोजगार स्थानिकांना उपलब्ध करून देण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. जल, जंगल, जमीन हे वैभव टिकवूनच येथे उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. व्यवसायाच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाने मुंबईपर्यंत जोडण्यात येणार आहे. यासोबतच चार्मोशी ते काकीनाडा बंदरापर्यंत मालवाहतुकीसाठी जलमार्ग तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिक प्रगतीला चालना : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात येत असलेले उद्योग येथील आदिवासी समाजाला आर्थिक सुबत्ता देतील. नागरिकांनी याकडे सकारात्मक पाहावे व रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सात हजार रोजगार
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस कराराच्या अंमलबजावणीचे उदाहरण म्हणजे आजचा भूमिपूजन होणारा हा उद्योग आहे. येथे पुढील एक ते दोन महिन्यांत दीड लाख कोटीचे प्रकल्प येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पातून सात हजार जणांना रोजगार मिळेल.