लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने व्यसनमुक्ती जागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मागील चार वर्षात जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत ३२ हजार ६८२ विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले आहे.प्रौढ नागरिकांबरोबरच मुलांमध्येही व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष करून गडचिरोली जिल्ह्यातील शाळकरी व महाविद्यालयीन युवक खर्रा, तंबाखू, सिगारेट या व्यसनांच्या अधिन झाले असल्याचे दिसून येते. या व्यसनांचा त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होत चालला आहे. व्यसनांपासून युवकांना दूर ठेवून सुदृढ भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आॅगस्ट २०१४ पासून सुरू केला आहे. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शालेय व महाविद्यालयीन स्तरावर कार्यशाळा घेतल्या जात आहेत. कला पथक, चलचित्र आदींच्या माध्यमातून गावपातळीवर सायंकाळी पोहोचून मार्गदर्शन केले जात आहे.जिल्हा सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हाभरातील ग्रामीण रूग्णालयांमध्ये १३ तंबाखू नियंत्रण समुपदेशन केंद्र बाह्यरूग्ण विभागातर्फे सुरू करण्यात आले आहेत. विविध पत्रके, माहिती पुस्तिका, फलके, कला पथक, दवंडी इत्यादी साधनांचा वापर करून जनजागृती केली जात आहे. शाळा व महाविद्यालयीन स्तरावर सुमारे १४० कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ३२ हजार ६८२ विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेऊन व्यसनमुक्तीच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग करून घेतला जात आहे.३५ शाळा तंबाखूमुक्त घोषिततंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत ३५ शाळा तंबाखुमुक्त घोषीत झाल्या आहेत. याबाबतचे फलक संबंधित शाळांनी लावले आहेत. ५०८ नागरिकांनी तंबाखु सोडला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाने दिली आहे.आणखी अधिक शाळा तंबाखुमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच कार्यक्रमांतर्गत ५०५ तंबाखु व खर्रा विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ९६ हजार ७१० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलीस विभाग यांनी केली आहे. जिल्ह सामान्य रूग्णालयाच्या चमूने सुध्दा ४१ पानठेल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४ हजार २८० विद्यार्थ्यांना दंड वसूल केला आहे.८८४ नागरिकांची कॅन्सर रोगाची तपासणीनागरिकांना व्यसनमुक्त करण्याबरोबरच त्यांची आरोग्य विषयक तपासणीही केली जात आहे. मागील चार वर्षाच्या कालावधीत शाळा, महाविद्यालय, रूग्णालये या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून सुमारे ८८४ नागरिकांची कॅन्सर रोगाबाबतची तपासणी करण्यात आली आहे. तंबाखुच्या व्यसनामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची सर्वाधिक शक्यता राहत असल्याने सदर तपासणी अतिशय फायद्याची आहे.
३२ हजार विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 10:18 PM
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने व्यसनमुक्ती जागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मागील चार वर्षात जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत ३२ हजार ६८२ विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देआरोग्य विभागाचा उपक्रम : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम