निविदा प्रक्रिया सुरू : गडचिरोलीच्या विविध वॉर्डात पक्के रस्ते व नाल्या लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेअंतर्गत गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डात अनेक योजनांवर रस्ते व नाल्यांची एकूण ५ कोटी ६६ लाख ६१ हजार रूपयांची विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता वॉर्डातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणार आहेत. गडचिरोली नगर पालिका प्रशासनाला शासनाकडून जिल्हा प्रशासनामार्फत दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा निधी विकास कामांसाठी प्राप्त होत असतो. या निधीतून आवश्यक त्या ठिकाणी रस्ते, नाली, लहान रपटे तसेच पथदिव्यांची व नळ पाईपलाईनची व्यवस्था करावयाची असते. गडचिरोली नगर पालिकेतर्फे वैशिष्ट्यपूर्ण, विशेष रस्ता अनुदान तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत एकूण ५ कोटी ६६ लाख ६१ हजार १३४ रूपये किंमतीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सदर कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. सन २०१६-१७ वर्षातील ही कामे ३१ मार्च २०१७ पूर्वी मंजूर झाली. त्यानंतर पालिका प्रशासनाने प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली. मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आठवडी बाजार, सिमेंट काँक्रिट रोड, नाली बांधकाम आदींचा समावेश आहे. या कामाचे अंदाजपत्रकीय किंमत २ कोटी ९३ लाख ५० हजार ३६० रूपये इतकी आहे. विशेष रस्ता अनुदान योजनेतून आयटीआय चौक ते गोकुलनगरला जोडणाऱ्या बायपास रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. या कामाची अंदाजे किंमत ७७ लाख ७३ हजार ७१३ रूपये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी नागरिकांकडून होत होती. चंद्रपूर मार्गे इंदिरा गांधी चौक परिसरात तसेच चामोर्शी मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते, परिणामी बरेचदा या भागात अपघातही घडले आहेत. त्यामुळे गोकुलनगरपासून आयटीआय चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे जाण्यासाठी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी प्रकर्षाने होऊ लागली. त्यानंतर नगर पालिका प्रशासनाने हे काम मंजूर केले. दलित वस्ती योजनेअंतर्गत नव्याने नाली व रपट्यांची १ कोटी ७५ लाख ८६ हजार २२५ रूपये किंमतीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये अनेक वॉर्डातील एकूण २८ कामांचा समावेश आहे. नगर पालिका प्रशासनाच्या वतीने दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दुसऱ्यांदा प्रभाग क्र. ६ मध्ये रस्ता खडीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे. या कामाची किंमत ६ लाख ५१ हजार ४८६ रूपये आहे. पालिका प्रशासनाने यापूर्वी पहिल्यांदा या कामाची निविदा प्रक्रिया काढली होती. मात्र पालिकेला काम करण्यासाठी कंत्राटदार मिळाला नाही. निविदा प्राप्त न झाल्याने प्रशासनाला दुसऱ्यांदा या कामाची निविदा प्रक्रिया राबवावी लागत आहे. असाच प्रकार प्रभाग क्र. ४ मधील दोन कामांचा आहे. सदर कामे यापूर्वीच मंजूर झाली होती. त्याची निविदा प्रक्रियाही राबविली होती. मात्र कंत्राटदाराने या निविदा प्रक्रियेत सहभाग न घेतल्याने पालिका प्रशासनाने दुसऱ्यांदा या कामाची निविदा प्रक्रिया हाती घ्यावी लागली आहे. सदर मंजूर कामे लवकर करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे. पालिका प्रशासनाकडून दिरंगाई ४गडचिरोली नगर पालिकेच्या क्षेत्रात मार्च २०१७ पूर्वी जवळपास पाच कोटींची विकास कामे मंजूर झाली. मात्र चार महिने उलटूनही या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. पालिका प्रशासनाच्या वतीने निविदा प्रक्रिया राबविण्यास बरीच दिरंगाई झाल्याने ही कामे आता लांबणीवर पडणार आहेत. जानेवारी २०१७ अखेर गडचिरोली नगर पालिकेवर नव्याने भाजपची सत्ता आली. निवडणूक आल्याने या कामात अल्पसा विलंब झाला. मात्र त्यानंतर फेब्रुवारी व मार्च महिन्यात या विकास कामांच्या बाबतीत करावयाच्या प्रशासकीय कार्यवाहीत बरीच दिरंगाई झाली. त्यामुळे ही कामे आता पावसाळ्यात होणार नाही. पावसाळ्यात रेतींचा तुटवडा असतो. परिणामी रेतीचे दरही वाढत असतात. जून महिन्यापासूनच रेतीचा प्रतीब्रॉस दर दोन हजार ते अडीच हजार तर काही ठिकाणी तीन हजार रूपये आहे.
शहरात ५ कोटी ६६ लाखांची ३३ कामे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2017 1:28 AM