मान्सूनपूर्व आढावा बैठक : तहसीलदारांनी केल्या सूचनाअहेरी : तहसीलदार एस. एन. सिलमवार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक शनिवारी घेण्यात आली. या आढावा बैठकीदरम्यान पुराचा तडाखा बसणाऱ्या ३३ गावांवर पावसाळ्याच्या दरम्यान विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश तहसीलदार सिलमवार यांनी दिले आहेत.आढावा बैठकीला संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस, पोलीस उपनिरीक्षक किरण दिडवाघ, अहेरीचे मुख्याधिकारी सी. एल. किरमे, कृषी अधिकारी वाय. जी. पदा, सिंचाईचे उपअभियंता पी. एम. इंगोले, महिला व बाल विकास अधिकारी आर. डी. मेश्राम, वनपरिक्षेत्राधिकारी स्वप्नील भोवते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता अजय कोतपल्लीवार, तालुका होमगार्ड समादेशक एस. एल. सिडाम, महावितरणचे अभियंता व्ही. आर. गावंडे, मंडळ अधिकारी रूद्रशेट्टी, शेंडे, श्रीरामे, अनदेलवार, तलाठी जे. जी. जल्लेवार आदी उपस्थित होते.आढावा बैठकीदरम्यान पुराचा तडाखा बसत असलेल्या गावातील नागरिकांना पुराच्या वेळेस सुरक्षित ठिकाणी नेणे, पूर येण्यापूर्वीची सूचना संबंधित गावकऱ्यांना देणे याबाबतचा आढावा तहसीलदारांनी घेतला. पावसाळ्यादरम्यान ग्रामीण व दुर्गम भागात साथीचे रोग पसरतात. त्यामुळे सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये औषधसाठा असणे अत्यंत गरजेचा आहे. याविषयीची माहिती देण्यात आली. पूर परिस्थितीच्या काळात बिनतारी संदेश यंत्रणा सुसज्ज ठेवणे, रेनगेजचे माहिती मिळविणे, धरणाचे पाणी नदीत सोडल्यास पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होणे, गावातील नाली साफ करणे, पावसाळ्यात नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, यासाठी ब्लिचिंग पावडर, तुरटी उपलब्ध करून देणे, वीज पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी विशेष उपाययोजना करणे, प्रत्येक शासकीय कार्यालयातील दूरध्वनी व भ्रमणध्वनी सुरू ठेवणे, शेतकऱ्यांना वेळेवर बी-बियाणे पुरविणे, बससेवा नियमित ठेवणे आदींचा आढावा घेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्जअहेरी तालुक्यातून प्राणहिता नदी वाहते. त्याचबरोबर लहान-मोठ्या अनेक नदी, नाल्यांना पावसाळ्यादरम्यान पुराचा फटका बसतो. या कालावधीत जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यासाठी काही कर्मचाऱ्यांना नेमणूक देण्यात आली आहे. पोलिसांवरही जबाबदारी सोपविली आहे.
अहेरी तालुक्यातील ३३ गावांना बसणार पुराचा तडाखा
By admin | Published: June 05, 2016 1:08 AM