लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : अत्यंत दुर्धर व अनुवांशिक आजार म्हणून ओळख असलेल्या सिकलसेलग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. त्यांना वेळाेवेळी रक्त द्यावे लागते. रक्ताचे प्रमाण कमी राहत असल्याने ग्रस्त रुग्ण वारंवार आजारी पडताे. या गंभीर आजाराचे जिल्ह्यात ३४ हजार ८०५ रुग्ण आहेत. ते वेळाेवेळी औषधाेपचार घेत आहेत. ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत सिकलसेल जनजागृती सप्ताह पाळला जाणार आहे. सिकलसेल आजाराच्या समूळ उच्चाटणासाठी उपचार उपलब्ध नसल्याने रुग्णांना वेळाेवेळी उपचार घ्यावा लागताे. शरीरातील हिमाेग्लाेबिनचे प्रमाण कमी हाेताच व्यक्ती अनेक आजाराला बळी पडून मृत्यूमुखी पडताे. सिकलसेल हा आजार गर्भधारणेच्या वेळी जेनेटीक बदलामुळे हाेताे. तसेच रक्तदाेषामुळे उद्भवणारा दुर्धर आजार असून जन्मापासून मनुष्याच्या अंतापर्यंत साेबत राहताे. रक्तात लाल व पांढऱ्या अशा दाेन प्रकारच्या पेशी असतात. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींचा आकार गाेल असताे. परंतु सिकलसेल रुग्णात पेशीचा आकार ऑक्सिजन पुरवठ्याअभावी विळ्यासारखा हाेताे. आई आणि वडील दाेघेही सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या आपत्यांना हा आजार हाेताे. त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक-ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह टाळावे. सिकलसेल वाहक-पीडित व्यक्तीने एकमेकांशी विवाह करू नये. गडचिराेली जिल्ह्यात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व अन्य समाजातील एकूण ३२ हजार २९४ सिकलसेल वाहक तर याच समाजातील २ हजार ५११ सिकलसेल ग्रस्त असे एकूण ३४ हजार ८०५ सिकलसेल रुग्ण आहेत. या रूग्णांना वेळाेवेळी औषधाेपचारासह शासकीय याेजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे.
विदर्भात दीड लाखांवर रुग्णराज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यात अडीच लाखांवर सिकलसेल रुग्ण आहेत. विदर्भातील ११ जिल्हे सिकलसेलने अधिक प्रभावित आहेत. दीड लाखांवर अधिक रुग्ण विदर्भात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ३४ हजार ४६५, गाेदिंया जिल्ह्यात १२ हजार ५४०, भंडारा जिल्ह्यात १३ हजार २००, नागपूर जिल्ह्यात २६ हजार ७६२, वर्धा जिल्ह्यात १४ हजार ८२ रुग्ण सिकलसेल ग्रस्त आहेत. याशिवाय अन्य जिल्ह्यांमध्ये आदिवासी दलित व मागासवर्गीय समाजात सिकलसेल रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
प्रत्येक सिकलसेल रुग्णांवर दरवर्षी १० ते ३० हजार रुपयांचा खर्च शासनातर्फे केला जाताे. परंतु ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब रुग्ण शासनाच्या लाभापासून वंचित राहतात. काेणताही सिकलसेल रुग्ण वंचित राहणार नाही, यासाठी शासनाने सिकलसेल जनजागृतीची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. - डाॅ.रमेश कटरे, अध्यक्ष, आराेग्यधाम संस्था, कुरखेडा