लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारू गाळण्यासाठी टाकलेला तब्बल ३५ क्विंटल मोहसडवा गडचिरोली तालुक्यातील मुरूमबोडी आणि बोथेडा येथील जंगल शिवारातून पोलिसांनी आणि मुक्तिपथ तालुका चमूने नष्ट केला. चार ठिकाणी जवळपास ४५ ड्रममध्ये हा सडवा टाकण्यात आला होता. दारूभट्ट्या आणि गाळण्यासाठी लागणारे साहित्यही पोलिसांनी नष्ट केले. २ लाखांचा हा मुद्देमाल असल्याचे सांगण्यात आले.मुरूमबोडी आणि बोथेडा या दोन्ही गावांमध्ये दारूविक्री मोठ्या प्रमाणात होते. बहुतांश घरी दारू गाळली जाते. आसपासच्या अमिर्झा, आंबेशिवनी गिलगाव, खुर्सा यासह २० गावांमध्ये ही दारू पोहोचवली जाते. तसेच जवळच्या गावातील लोकही येथे मोठ्या प्रमाणात दारू पिण्यासाठी येतात.जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात मोहाचा सडवा टाकल्याची माहिती मुक्तिपथ तालुका चमुला मिळाली होती. त्यांनी गडचिरोली पोलिसांना माहिती दिली. बुधवारी सकाळी ६ वाजतापासून पोलीस आणि मुक्तिपथ चमूने सर्वप्रथम बोथेडा गावाला लागून असलेला तलाव परिसर पिंजून काढला असता मोहसडवा भरून असलेले सहा ड्राम सापडले. हा सडवा तलावात टाकून नष्ट करण्यात आला. यानंतर मुरूमबोडी जंगल परिसरात तीन ठिकाणी ३९ ड्रम सडवा सापडला. चार ठिकाणी दारूभट्ट्या लावण्यात आल्या होत्या. अॅल्युमिनियमचे २२ हंडे पोलिसांना सापडले. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक डी.डी.उदार यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार बी.एस. ठाकरे, पोलीस हवालदार खरकाडे, डांगे, खोब्रागडे, रामटेके यांच्या चमूने केली. मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर आणि उपसंघटक रेवनाथ मेश्राम या कारवाईत सहभागी झाले होते.देसाईगंजमध्ये ११ लिटर दारू जप्तदेसाईगंज शहरातील डॉ.आंबेडकर वॉर्ड येथील मुक्तिपथ संघटनेने ११ लिटर मोहाची दारू पकडली. एका इसमाकडे सडवा असून दारूच्या कॅन असल्याची माहिती वॉर्ड संघटनेला बुधवारी सकाळी मिळाली. त्यांनी या घराची तपासणी केली असता एक ड्रम मोहसडवा आणि ११ लिटर दारू सापडली. महिलांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सडवा नष्ट करून दारू जप्त केली. आणखी एका महिलेकडे सडवा असल्याचे संघटनेला सायंकाळी निदर्शनास आले. त्यांनी या महिलेकडील एक ड्रम सडवा नष्ट केला.
जंगलातील ३५ क्विंटल मोहसडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 5:00 AM
बुधवारी सकाळी ६ वाजतापासून पोलीस आणि मुक्तिपथ चमूने सर्वप्रथम बोथेडा गावाला लागून असलेला तलाव परिसर पिंजून काढला असता मोहसडवा भरून असलेले सहा ड्राम सापडले. हा सडवा तलावात टाकून नष्ट करण्यात आला. यानंतर मुरूमबोडी जंगल परिसरात तीन ठिकाणी ३९ ड्रम सडवा सापडला. चार ठिकाणी दारूभट्ट्या लावण्यात आल्या होत्या. अॅल्युमिनियमचे २२ हंडे पोलिसांना सापडले. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.
ठळक मुद्दे४५ ड्रममध्ये होता भरून : मुक्तिपथ आणि पोलिसांची संयुक्त कारवाई