पालकांचा आरोप : जवाहर नवोदय विद्यालयाने वेळेवर नाकारलेलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयाने ऐन वेळेवर अकरावीसाठी प्रवेश नाकारल्याने ३५ विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. याबाबतची तक्रार पालकांनी जिल्हाधिकारी यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्याकडे केली आहे. जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे दहावीच्या दोन तुकड्या आहे. या दोन तुकड्यांमध्ये ८० विद्यार्थी शिक्षण घेत होते. हे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र अकराव्या वर्गात एकच तुकडी आहे. या तुकडीची प्रवेश क्षमता ४५ विद्यार्थी एवढी आहे. त्यामुळे नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवून ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार नाही. त्यांच्या टीसी तत्काळ देणे आवश्यक होते. मात्र जवाहर नवोदय विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी संपूर्ण ८० विद्यार्थ्यांच्या टीसी स्वत:कडे राखून ठेवले आहे. एक महिन्याच्या कालावधीनंतर ४५ विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन उर्वरित विद्यार्थ्यांना टीसी घेऊन जाण्याबाबत सांगितले. आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया जवळपास आटोपली आहे. त्यामुळे कोणत्याही महाविद्यालयात जागा शिल्लक नाही. अशा परिस्थितीत प्रवेश मिळण्याची शक्यता मावळली आहे. परिणामी या विद्यार्थ्यांचे यावर्षीचे सत्र वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्याध्यापकांनी ८ जुलैपासून टीसी देण्यास सुरूवात केली आहे, असा आरोप जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. निवेदन देतेवेळी दिगांबर फुलबांधे, ईशा फुलबांधे, सदाशिव लेखामी, जोगेश्वरी लेखामी, हरबाजी ठाकरे, वर्षा आकरे, खोकन मंडल उपस्थित होते. याबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी १० दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर शाळेतच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदन स्वीकारतेवेळी छाया कुंभारे, विजय श्रुंगारपवार, त्र्यंबक खरकाटे, राहूल करमे आदी उपस्थित होते.
३५ विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत
By admin | Published: July 14, 2017 2:16 AM