गडचिरोली, आरमोरीत लोक अदालत : १९ लाख ५७ हजार वसूलगडचिरोली/आरमोरी : सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच न्यायालयात ८ आॅक्टोबर रोजी शनिवारला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. गडचिरोली व आरमोरी येथील न्यायालयात झालेल्या लोक अदालतीत एकूण ३६७ प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा करण्यात आला. गडचिरोली येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून १९ लाख ५७ हजार ५४२ रूपयांची वसुली करण्यात आली आहे. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने जिल्हा न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष यू. एम. पदवाड यांच्या देखरेखीखाली गडचिरोलीच्या जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीत एकूण ७७२ प्रकरणे दाखल करण्यात आले. यापैकी ३४३ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले तर लोक अदालतीच्या माध्यमातून १९ लाख ५७ हजार ५४२ रूपयांची वसुली करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश सु. तु. सूर यांनी पॅनल क्रमांक १ वर तर मुख्य न्याय दंडाधिकारी तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव आर. बी. रेहपाडे यांनी पॅनल क्र. २ वर काम पाहिले. तडजोडीस पात्र फौजदारी खटले, मोटार वाहन कायद्याअंतर्गतची प्रकरणे, लघु फौजदारी प्रकरणे तसेच नगर परिषदबाबत व इतर प्रकरणे मिळून एकूण ७७२ प्रकरणे या लोक अदालतीत सादर करण्यात आले होते. लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी वकील मंडळी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. आरमोरी तालुका विधी सेवा समितीच्या वतीने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात घेण्यात आलेल्या लोक अदालतीत एकूण २४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. कायद्याचे कलम २०० अन्वये २३ व तडजोडीतून एक प्रकरण निकाली काढण्यात आले. यावेळी प्राधिकृत अधिकारी म्हणून न्या. संजय अटकारे, पॅनल सदस्य म्हणून प्रा. गंगाधर जुआरे व अॅड. ए. एम. कानकाटे उपस्थित होते. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या संमतीने सर्व गुन्ह्यांकरिता तडजोड शुल्क भरून २३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर तडजोडी योग्य एका प्रलंबित मामल्याचा निपटारा करण्यात आला. यशस्वीतेसाठी न्यायालयाचे वरिष्ठ लिपीक प्र. का. आत्राम, कनिष्ठ लिपीक एस. आर. कामडी, पी. पी. देवकर, एन. डी. कोहळे यांनी सहकार्य केले.
३६७ प्रकरणे निकाली
By admin | Published: October 09, 2016 1:44 AM