गडचिरोली : मागास आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात गावकर्यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत तसेच गावपातळीवर ३७१ जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करून जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. स्थापन करण्यात आलेल्या ग्रामपंचायत पातळीवरील जैवविविधता व्यवस्थापन समित्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील २५ समित्यांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यात ४, देसाईगंज तालुक्यात ७, कुरखेडा तालुक्यात १, कोरची तालुक्यात ८, धानोरा तालुक्यात १५, चामोर्शी तालुक्यात १६, मुलचेरा तालुक्यात २, अहेरी तालुक्यात १२, एटापल्ली तालुक्यात ३१ व भामरागड तालुक्यात १ जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. सिरोंचा तालुक्यात मात्र एकही समिती स्थापन करण्यात आली नाही. गावपातळीवरील जैवविविधता समिती स्थापन करण्याच्या कामात एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी मोठा पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या तालुक्यात सर्वाधिक १0२ समित्या स्थापन करण्यात आले आहे. गडचिरोली तालुक्यात १३, आरमोरी ७, देसाईगंज ११, कुरखेडा ३, कोरची १९, धानोरा ४३, चामोर्शी ६, मुलचेरा ८, अहेरी ३१, भामरागड तालुक्यात ६ गावपातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत व गावपातळीवर सर्वाधिक १३३ समित्या स्थापन करून एटापल्ली या अतिदुर्गम तालुक्यातील नागरिकांनी जैवविविधतेचे महत्व पटवून दिले आहे. राज्य शासनाने जैवविविधतेचे संवर्धन व्हावे यासाठी जैवविविधता कायदा पारित केला आहे. मात्र असे असतांनासुद्धा विदर्भातील अन्य तालुक्यांनी जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात उदासीनता दाखविली आहे. नागरिकांच्या सध्याच्या उपजिविकेच्या शाश्वतीसाठी आणि उपजिविकेच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी जैवविविधता व्यवस्थापनाची अतिशय गरज आहे. गडचिरोलीसारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या जिल्ह्यात अनेक प्रकारची जैवविविधता आढळून येते. जिल्ह्यात ७८ टक्के वन, अनेक पशु, प्राणी, नदी, नाले, खनिज संपत्ती तसेच नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे आहेत. वनामध्ये अनेक प्रकारची वनौषधी आहे. जिल्ह्यात विविध प्रकारचे मासेही आहेत. या सर्व प्रकारच्या जैवविविधतेचे संवर्धन होण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जैवविविधता व्यवस्थापन समित्या मोलाचे कार्य करणार आहेत. यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
३७१ जैवविविधता समित्या स्थापन
By admin | Published: May 24, 2014 11:37 PM