सिरोंचा तालुका : दुर्गम भागात अधिक दराने धान्य विक्री सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात एकूण १०४ स्वस्त धान्य दुकाने आहेत. यापैकी ३८ दुकानांमध्ये नवसंजीवनी योजनेंतर्गत चार महिन्यांचे धान्य पोहोचविण्यात आले आहेत. यामध्ये सिरोंचा, सर्कल अंतर्गत १४ दुकाने व आसरअल्ली सर्कलमधील २४ दुकानांचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यातील जंगलाने व्याप्त असलेल्या अनेक गावांमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही. नदी, नाल्यांवर पूल नसल्याने वाहन जात नाही. त्यामुळे अशा गावांना नवसंजीवनी योजनेंतर्गत जून महिन्यातच धान्य उपलब्ध करून दिली जाते. या अंतर्गत ३८ दुकानांना धान्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र वितरण प्रक्रिया योग्य पध्दतीने होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. दुकानाची समयसारणी सकाळी ७ ते १२ व दुपारी २ ते ६ वाजेपर्यंतची असली तरी अनेक दुकानदार या वेळेत दुकानच उघडत नाही. दोन ते तीन दिवसच धान्य वाटप करून दुकान बंद ठेवतात. एपीएल प्राधान्य गट केशरी कार्डधारकांना प्रती व्यक्ती दोन किलो गहू २ रूपये दराने व तीन किलो तांदूळ ३ रूपये दराने देण्याचे आदेश आहेत. अंत्योदयसाठी १० किलो गहू व २५ किलो तांदूळ व प्रती व्यक्ती ३०० ग्रॅम साखर देय आहे. साखरेचा शासकीय दर १३ रूपये ५० पैसे प्रती किलो प्रमाणे आहे. दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांना गहू व तांदूळ प्रती व्यक्ती २ रूपये व ३ रूपये दराने वाटप करण्याचे निर्देश आहेत. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील अशिक्षीत जनतेचा फायदा रेशन दुकानदार उचलतात. त्यांच्याकडून अधिक किमत आकारली जाते. केरोसीनच्या वितरणात सुध्दा अनियमितता आहे. ट्रॅक्टरचालकांना ३५ ते ४० रूपये लिटर दराने विक्री केली जात आहे.
३८ गावांना संजीवनी योजनेचे धान्य
By admin | Published: July 17, 2016 1:13 AM