गडचिराेली : झिंग्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सिरोंचा येथील प्राणहिता नदीत २८ मार्चला तब्बल ३८ किलो वजनाचा मासा आढळला. बोध प्रजातीचा हा भला मोठा मासा पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
सिरोंचा तालुक्यातून प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती नद्या वाहतात. सिरोंचाला चिकटून प्राणहिता नदी आहे. नदीचे पाणी गोड असून येथे मच्छीमारांची गर्दी असते. या भागातील हा प्रमुख व्यवसायांपैकी एक आहे. झिंगा व कोळंबी माशासाठी सिरोंचा प्रसिद्ध आहे. दरम्यान, २८ मार्चला नेहमीप्रमाणे मच्छीमार मासे पकडण्यासाठी जाळे लावून बसले होते. त्यात मोठ्या वजनाचा मासा अडकला. या माशाचे वजन केले तेव्हा तो ३८ किलो भरला. हा मासा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. दरम्यान, मच्छीमाराने हा मासा विक्रेत्यास विकला. या माशाचा व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावरदेखील कुतूहलाचा विषय ठरला हाेता.