प्रेरणादायी कार्य : पोटेगाव पोलीस मदत केंद्राचा उपक्रमपोटेगाव : उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस मदत केंद्र पोटेगाव येथे मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात सुमारे ४० पोलीस जवानांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बी. एच. दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. खटके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र पोटेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. म्हशाखेत्री होते. पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक खटके तसेच सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक बलकार सिंग यांनी रक्तदान शिबिरादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रभारी अधिकारी बी. एच. दुधाळ यांनी दर तीन महिन्याला रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजूंना रक्ताची मदत करण्याचा संकल्प केला. रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण येत्या काही दिवसात आयोजित करण्यात येणाऱ्या जनजागरण मेळाव्यादरम्यान केले जाणार आहे. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरीक्षक खटके तर आभार पोलीस नाईक विजय वासेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवालदार पेंदाम, मडावी, फुलझेले, उसेंडी, धनराज बोरकुटे, पोलीस शिपाई गाजभाई, गर्दे, तुरे, गावडे, कुळमेथे, ठाकरे, भताने यांच्यासह पोलीस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पोलिसांच्या या उपक्रमाचे पोटेगाव येथील नागरिकांनी कौतुक केले आहे. यावेळी अनेक जवानांनी नियमितपणे रक्तदानाचा संकल्प केला. (वार्ताहर)
४० पोलीस जवानांचे रक्तदान
By admin | Published: October 06, 2016 2:13 AM