देसाईगंजात सामूहिक विवाह सोहळा : अहेले मुस्लीम जमातचा स्तुत्य उपक्रम देसाईगंज : अहेले मुस्लिम जमात संघटना देसाईगंजच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुधवारला देसाईगंज येथील मदिना मस्जिदच्या प्रांगणात मुस्लिम समाजातील उपवर-वधूंचा सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात रितीरिवाजाप्रमाणे मुस्लिम समाजातील ४० जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला. सदर लग्नविधी पार पाडण्यासाठी मदिना मस्जिदचे मौलाना कफील अहमद नुरी, गौसिया हनिफिया मदरसाचे कारी नजरूक बारी, गडचिरोली येथील हाजी मौलाना मस्तान रिझवी, हाजी मिर्झा गुलाम अहमद, माजी जि. प. उपाध्यक्ष हाजी बशिर पटेल यांनी सहकार्य केले. गेल्या सहा वर्षांपासून देसाईगंज येथे मुस्लिम समाजातर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन सातत्याने केले जात आहे. बुधवारी पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांमध्ये पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यासह मध्यप्रदेश, तेलंगणा, उत्तरप्रदेश राज्यातील मुस्लिम समाजातील जोडप्यांचा समावेश आहे. सदर सामूहिक सोहळ्याला तब्बल ३० हजार मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी बशिर पटेल कुरेशी, संचालन माजी नगरसेवक सय्यद आबिदअली, शरीफ खान यांनी केले. विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना अहेले मुस्लिम जमात संघटनेतर्फे कपाट, पलंग तसेच भांडे देण्यात आले. पैसा व वेळेची बचत करण्यासाठी अशा प्रकारच्या सामूहिक सोहळ्याची गरज आहे, असे बशिर कुरेशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी खलील खान पठाण, बशिर कुरेशी, आरिफ पटेल, गुफरान कुरेशी, रोशन खानानी, मिर उमेदअली सय्यद, हाजी अब्दुल कादर कुरेशी, अब्दुल सलाम शेख, राजीक शेख, नूर खान, जावेद कुरेशी, लतीफ रिझवी, माजी नगरसेवक मोहम्मद जमाल शेख यांच्यासह मुस्लिम बांधवांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) सहा वर्षांत १७५ मुस्लीम जोडपी विवाहबद्ध ४अहेले मुस्लिम जमात संघटना देसाईगंजच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने सामूहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम घेतल्या जात आहे. पहिल्या वर्षीच्या मेळाव्यात मुस्लिम समाजातील ११ जोडपी, दुसऱ्या वर्षी २३, तिसऱ्या वर्षी ३३, चवथ्या वर्षी २९, पाचव्या वर्षी ३९ व यंदा सहाव्या वर्षी ४० अशा एकूण १७५ मुस्लिम जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला.
४० मुस्लीम जोडपी अडकली लग्नाच्या बेडीत
By admin | Published: December 29, 2016 1:37 AM