गडचिरोली : नक्षलग्रस्त भागातील वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडून आतापर्यंत ४०१ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. या रेल्वे मार्गाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदार अशोक नेते यांना १२ एप्रिल रोजी लोकसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिले. ५२.५ किमी लांबीच्या वडसा-गडचिरोली या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी ४०१ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी १६१ कोटी रूपये आवंटीत करण्यात आले आहे. तसेच राज्य शासनाने ५० टक्के वाटा देण्याचे यावर्षीच्या अर्थसंकल्पात निश्चित केले आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील तीन रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारच्या वाट्याची १५० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचाही समावेश आहे. लोकसभेत खा. नेते यांनी सदर मार्गाच्या कामाबाबत भूसंपादन सुरू आहे. परंतु त्याची गती मंद असल्याचे तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेत सांगितले होते. या मार्गाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच या मार्गाच्या कामाचे भूमिपूजनही करावे, असे सांगितले. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी भूमिपूजन लवकरच करण्यात येईल, असे कळविले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)नागभीड-नागपूर ब्रॉडगेजचे काम सुरू करानागपूर-नागभीड ब्रॉडगेज रेल्वे लाईनसाठी ७०८ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाला त्वरीत सुरूवात करण्यात यावी, अशी मागणी लोकसभेत खासदार अशोक नेते यांनी केली. नागपूर-नागभीड हा १०६ किमी लांबीचा रेल्वे मार्ग असून ७०८.११ कोटी रूपये या कामासाठी मंजूर झाले आहेत. परंतु निती आयोगाची मंजुरी नसल्यामुळे अजुनही काम सुरू झालेले नाही, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत दिली व हे काम त्वरीत सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील हा अविकसीत भाग असून या भागात मोठ्या प्रमाणावर साधन संपत्ती आहे. रेल्वे आल्यास या भागाच्या विकासाला चालना मिळेल, असेही खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत सांगितले. त्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ६१ कोटी रूपयांची तरतूद वडसा-गडचिरोली मार्गासाठी २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.
वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी ४०१ कोटी रूपये मंजूर
By admin | Published: April 14, 2017 1:14 AM