गडचिराेली : शैक्षणिक सत्र सन २०१६-१७ मध्ये केलेल्या संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांना प्राथमिक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावर सन २०१७ मध्ये पदावनत करण्यात आले हाेते. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी कार्यवाही करून ‘त्या’ ४१ शिक्षकांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर पदाेन्नती दिली. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने समुपदेशनाद्वारे त्यांची पदस्थापना करण्यात आली.
शिक्षक संवर्गाच्या विविध मागण्या निकाली काढण्यासाठी सीईओ आशिर्वाद यांच्याकडून सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. त्या अनुषंगाने कार्यवाही करून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत.
उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर पदाेन्नती मिळालेले परंतु सन २०१६-१७ च्या संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ शिक्षकांना सन २०१७ मध्ये प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदांवर वेतन संरक्षण देऊन पदावनत करण्यात आले हाेते. या शिक्षकांना पुन्हा उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर पदाेन्नती मिळण्याची प्रतीक्षा हाेती. उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदाचे त्यांना वेतन मिळत असले तरी त्यांना मूळ पदावर पदाेन्नती मिळणे आवश्यक हाेते. तशी मागणीही या शिक्षकांकडून हाेत हाेती. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी या मागणीचा तातडीने विचार करून पदाेन्नती देण्याची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला.
एकूण ८५ शिक्षकांपैकी ४४ शिक्षक सेवानिवृत्त झाले. उर्वरित ४१ शिक्षकांना पदाेन्नती देण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. सर्व ४१ पदाेन्नत उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना समुपदेशनाने पसंतीच्या ठिकाणी पदस्थापना देऊन त्यांना न्याय देण्यात आला.
बाॅक्स .....
बदलीसाठी शाळांची यादी झाली अद्ययावत
शिक्षक संवर्गाच्या सन २०२१मधील सर्वसाधारण बदली प्रक्रिया दीपावलीदरम्यान पार पाडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील अवघड व सर्वसाधारण क्षेत्रांतर्गत शाळांची अद्ययावत यादी तयार करण्यात आली आहे.
काेट .......
शिक्षकांचे सर्व सेवाविषयक लाभ मंजुरीचा आढावा नियमित घेतला जात आहे. काेराेना काळात संघटनेच्या सभा हाेऊ शकत नसल्या तरी त्यांचे सेवाविषयक लाभ मंजूर हाेतील, याकडे प्राधान्याने लक्ष आहे.
- कुमार आशिर्वाद, सीईओ, जि. प.