लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गरीब कुटुंबाला गॅस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत ४१ हजार १९९ महिला लाभार्थ्यांना गॅसचे वितरण करण्यात आले आहे.ग्रामीण भागात सरपणाच्या सहाय्याने स्वयंपाक केला जात असल्याने जंगलाची मोठ्या प्रमाणात तोड केली जात होती. सरपणाच्या माध्यमातून स्वयंपाक केल्याने महिलांना धुराचा त्रासही होत होता. धुरामुळे फुफ्फुसाचे विकार होत असल्याचे आढळून आले आहे. यातून महिलांची मुक्तता करण्यासाठी केंद्र शासनाने १ मे २०१६ रोजी प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गरीब महिलांना अनुदानावर गॅसचे वितरण केले जाते.गडचिरोली जिल्ह्यात १६ आॅक्टोबर २०१६ पासून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरूवात झाली. गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक असल्याने या योजनेला फारसा प्रतिसाद मिळणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र हा अंदाज खोटा ठरला. जिल्हाभरात जवळपास वर्षभराच्या कालावधीत ४१ हजार १९१ महिला लाभार्थ्यांना गॅसचे वितरण करण्यात आले आहे. उज्वला योजनेसाठी एकूण ५७ हजार ४९२ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. अर्जांची छाणनी झाल्यानंतर ४९ हजार ८६० लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यातील ४१ हजार १९९ महिलांना गॅसचे वितरण झाले आहे. ८ हजार ६६१ महिला अजुनही गॅस कनेक्शनच्या प्रतीक्षेत असून त्यांना लवकरच गॅसचे वितरण केले जाणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली आहे. ग्रामीण भागात या योजनेबाबत जनजागृती झाली नसल्याने सदर नागरिक वंचित असल्याचे दिसून येते.वन विभागातर्फेही गॅस वितरणजंगलाची तोड थांबून स्थानिक नागरिकांचे वन संवर्धनासाठी सहकार्य मिळावे, यासाठी वन विभागाने अनुदानावर गॅस वितरणाची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ५० हजार कुटुंबांना लाभ देण्यात आला आहे. आता या योजनेचा आणखी विस्तार करण्यात आला असून जंगलाच्या सभोवताल असलेल्या गावांनाही लाभ दिला जात आहे. या योजनेचे विशेष म्हणजे, पहिले तीन वर्ष मोफत गॅस सिलिंडर भरून दिले जातात. त्यामुळे उज्वला योजनेपेक्षाही वन विभागाच्या योजनेला नागरिक अधिक पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते. त्यामुळे काही महिलांनी उज्वला योजनेकडे पाठ फिरविली.शेगडीच्या सक्तीने लुबाडणूकगॅस कनेक्शन खरेदी करताना संबंधित व्यक्तीला गॅस कंपनीकडे सिलिंडरची रक्कम अनामत म्हणून जमा करावी लागते. उज्वला योजनेंतर्गत अनामत रक्कम जमा करण्याची गरज नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीला गॅस सिलिंडर मोफत उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र गॅस कंपन्या व एजन्सीधारकांनी संबंधित लाभार्थ्याला शेगडी व इतर साहित्य सक्तीचे केले. शेगडी दामदुप्पट किंमतीला विकून लाभार्थ्यांची लुबाडणूक केली आहे. याकडे पुरवठा विभागाने सपशेल दुर्लक्ष केले आहे. उज्वला योजनेंतर्गत शेगडीची सक्ती करण्याची तरतूद नाही.
४१ हजार महिलांना उज्ज्वला योजनेचा गॅस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:07 PM
गरीब कुटुंबाला गॅस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत ४१ हजार १९९ महिला लाभार्थ्यांना गॅसचे वितरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्देकेंद्र शासनाची योजना : ८ हजार ६६१ लाभार्थी योजनेच्या प्रतीक्षेत