लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वंशाला वारस म्हणून मुलगाच हवा या मनोधारणेतून बाहेर येऊन मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासोबतच त्यावर समाधान मानण्याची मानसिकता समाजात हळूहळू तयार होत आहे. जिल्ह्यात एक वर्षात ४१३ कुटुंबांनी दोन मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. त्यांना आता प्रत्येकी २५ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मुदत ठेवीच्या रुपात दिले जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेअंतर्गत सदर आर्थिक लाभ योजना राबविली जाते. यात एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबाला ५० हजार रुपये तर दोन मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाºया कुटुंबाला २५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र ही रक्कम मुलीच्या नावे मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट) योजनेत ठेवली जाते. ती १८ वर्षाची झाली किंवा दहावी पास झाली की त्या पैशाचा लाभ घेता येतो. मुलीचे शिक्षण किंवा लग्नासाठी हे पैसे उपयोगी पडू शकतात.२०१७-१८ या आर्थिक वर्षात एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणारे ४ तर दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणारे ४१३ कुटुंब नोंदविल्या गेले. यात सर्वाधिक १३९ शस्त्रक्रिया गडचिरोली तालुक्यात झाल्या आहेत. याशिवाय चामोर्शी तालुक्यात ९२ तर देसाईगंज तालुक्यात ७६ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या जनजागृतीतून आणि प्रोत्साहनातून सदर शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यांना अद्याप सदर योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नसला तरी त्यांचे खाते काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील आठवडाभरात त्यांना मुदत ठेव प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
४१३ जणांनी केले दोन मुलींवर कुटुंब नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:24 PM
वंशाला वारस म्हणून मुलगाच हवा या मनोधारणेतून बाहेर येऊन मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासोबतच त्यावर समाधान मानण्याची मानसिकता समाजात हळूहळू तयार होत आहे.
ठळक मुद्देप्रत्येकी २५ हजारांचा लाभ : माझी कन्या भाग्यश्री योजनेतून प्रोत्साहन