१९ जून रोजी नोंदणी : शारीरिक चाचणीनंतर निवड लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्फत ४१७ मानसेवी होमगार्ड पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. १९ जून रोजी गडचिरोली येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत येणाऱ्या महिला व पुरूष उमेदवारांची तालुकानिहाय नोंदणी केली जाणार आहे. होमगार्डपदासाठी उमेदवार कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा, त्याचे वय २० ते ५० वर्ष दरम्यानचे असावे, पुरूषांकरिता १६२ सेमी उंची व महिलांकरिता १५० सेमी उंची असणे आवश्यक आहे. पुरूष उमेदवारांकरिता छाती न फुगविता ७६ सेमी व फुगवून ८१ सेमी असावी, विहीत केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक करणे अशा शारीरिक चाचण्या द्याव्या लागतील. निवड होऊन पात्र ठरलेले उमेदवार हे वेतनी सेवेत असतील. तरी त्यांना वेतनी सेवेत असल्यास कार्यालयाचे अथवा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल व सक्षम अधिकाऱ्यांचे शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्रधारक व इतर अन्य (जड वाहन चालक परवाना, आयटीआय व खेळाडू प्रमाणपत्रधारकांना संबंधित प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक राहील. उमेदवारास नोंदणीच्या वेळी स्वखर्चाने यावे लागेल. नोंदणीवेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. उमेदवारांची निवड गुणवत्तेवर करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्फत कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यात होणार ४१७ होमगार्डची भरती
By admin | Published: June 14, 2017 1:52 AM