मुलचेरा तालुक्यातील स्थिती : यंदा ३ हजार ६७० शौचालयाचे उद्दिष्ट मुलचेरा : भाजपप्रणीत केंद्र शासनाने ग्रामीण व दुर्गम भागातील गावांची गोदरीमुक्तीकडे वाटचाल वाढविण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) सुरू करून वैयक्तिक शौचालय बांधण्याचा जम्बो कार्यक्रम हाती घेतला. या अभियानांतर्गत मुलचेरा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीमध्ये यंदा सन २०१६-१७ वर्षात एकूण ३ हजार ६७० वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. गतवर्षी सन २०१५-१६ मध्ये तालुक्यात केवळ २९८ शौचालयाचे काम पूर्ण करण्यात आले असून अद्यापही ४२३ शौचालयाचे काम अपूर्ण आहे. वार्षिक कृती आराखडा सन २०१६-१७ अंतर्गत शासनाकडून वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना १२ हजार रूपये अनुदान मिळणार आहे. यंदा २०१६-१७ वर्षात मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली माल, कालीनगर, बोलेपल्ली, गोविंदपूर, येल्ला, सुंदरनगर, शांतीग्राम, विवेकानंदपूर व कोठारी या ९ ग्रामपंचायतीअंतर्गत संबंधित गावांमध्ये एकूण ३ हजार ६७० लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ देण्यात येणार आहे. सन २०१५-१६ वर्षात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत मुलेचरा तालुक्यातील गोमणी, वेंगनूर व मल्लेरा या तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये एकूण १ हजार १७७ वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यापैकी ६९४ शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून अद्यापही ४२३ वैयक्तिक शौचालयाचे काम अपूर्ण स्थितीत आहेत. लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी २५ टक्के रक्कम अनुदान म्हणूून पं. स. स्तरावरून देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात शौचालय कामाला गती येणार आहे. (तालुका प्रतिनिधी) केवळ एकच गाव गोदरीमुक्त घोषित सन २०१५-१६ या वर्षात वैयक्तिक शौचालय बांधकामाच्या अनुदानाची रक्कम मुलचेरा पंचायत समितीस्तरावर उशिरा पाठविण्यात आली. त्यामुळे शौचालय बांधकाम मंदावले. परिणामी ४२३ शौचालयाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. मुलचेरा तालुक्यातील लगाम हे एकमेव गाव गोदरीमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. गोदरीमुक्तीसाठीचा मल्लेरा ग्रामपंचायतीचा प्रस्ताव यावर्षी प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मुलचेरा तालुक्यात शौचालय बांधकामाची गती वाढविण्याची गरज आहे.
४२३ शौचालयाचे काम अपूर्ण
By admin | Published: July 14, 2016 1:16 AM