काेराेना महामारीच्या समस्येमुळे मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून शासनाच्या निर्देशानुसार शाळांचे सर्व वर्ग बंद करण्यात आले. काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थितीही ६५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. एकाच वाॅर्डात घराजवळ राहणारे, शेजारचे इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी शाळेत जात आहेत; मात्र इयत्ता पहिली ते चवथीचे विद्यार्थी घरी राहत असल्याने ते कंटाळले आहेत. लहान मुलांचे मन चंचल असते. त्यांच्यामध्ये माेठ्या प्रमाणात ऊर्जा असते. या ऊर्जेचा चांगल्या बाबींसाठी उपयाेग झाला तर मुले शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात यशस्वी हाेतात. त्यामुळे इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हाेण्यासाठी तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व विकास हाेण्यासाठी पहिली ते चवथीचे वर्ग सुरू हाेणे गरजेचे आहे.
बाॅक्स...
जिल्ह्यातील पहिली ते चवथीचे शाळा - १५२२
विद्यार्थी संख्या - ४६२५२
काेट.....
शाळेमध्ये गेल्यावर अनेक वर्गमित्र भेटतात. त्यांच्यासाेबत खेळायला मिळते. घरी राहून कंटाळा आल्यामुळे आम्हाला शाळेत जायचे आहे. माझे माेठे भाऊ व बहीण शाळेत जात आहेत; मात्र माझी शाळा बंद असल्याने मला घरी राहावे लागत आहे. शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे.
- स्वरूप मडावी, विद्यार्थी, इयत्ता पाचवी.
---------------------------
माेठ्या मुला, मुलींच्या शाळा सुरू झाल्या. ते शाळेत जात आहेत. माझ्या वर्गातील व शाळेतील मुले, मुली काेराेना संसर्गाच्या कारणामुळे घरीच राहत आहेत. शाळा सुरू न झाल्याने घरी राहून अभ्यास करावा लागत आहे. घरी राहून कंटाळा आला असून, शाळेकडे मन ओढले आहे.
- प्राजक्ता भांडेकर, विद्यार्थिनी, इयत्ता तिसरी.
------------------------------
स्मार्ट फाेनच्या माध्यमातून माझ्या पाल्याला शिक्षकांकडून गृहपाठ दिला जात आहे. मुलाला साेबत घेऊन अभ्यास करून घ्यावा लागत आहे; मात्र प्रत्यक्ष शिक्षण व ऑनलाइन शिक्षणात बराच फरक आहे. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याशिवाय विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत पूर्वपदावर येणार नाही.
- महेश काेठारे, पालक.
------------------
ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून माझ्या पाल्याला व त्याच्या वर्गमित्रांना स्मार्ट फाेनची ओढ निर्माण झाली आहे. अर्धा ते एक तास हाेमवर्क व इतर अभ्यास केल्यावर ताे व्हिडिओ गेम पाहण्याचा प्रयत्न करीत आहे. इयत्ता पहिली ते चवथीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान हाेत आहे.
- विनाेद चाैधरी, पालक
बाॅक्स...
पालक झाले त्रस्त
इयत्ता पहिली ते चवथीचे विद्यार्थी म्हटले की त्यांच्याकडे पालकांना बारकाईने लक्ष ठेवावे लागते. त्यांच्या दरराेजच्या सवयी, अभ्यास, गृहपाठ आदी सर्व पालकांना पाहावे लागते. शाळा सुरू हाेऊन प्रत्यक्ष वर्ग भरत असले की, चार ते पाच तास विद्यार्थी शाळेत राहतात. शाळेमुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागते; मात्र गेल्या १० महिन्यांपासून लहान मुलांची शाळा पूर्णत: बंद असल्याने मुले, मुली घरी राहून मस्ती करीत आहेत. त्यांचा खाेडकरपणा वाढल्यामुळे बरेच पालक त्रस्त झाले आहेत. इयत्ता पहिली ते चवथीचे वर्ग सुरू व्हावे, अशी मागणी पालकांकडून हाेत आहे.