लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/आष्टी : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असताना बुधवारी अचानक ४८ रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे.बुधवारी ७५० कोरोना तपासण्यांचा अहवाल आला. त्यात वेगवेगळ्या ठिकाणचे २४ कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३० हजार ८७८ वर पोहोचली आहे. दिवसभरात एकही कोरोनामुक्त झाला नाही. त्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढून ३७ वर गेली. त्यात नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ११ आणि अहेरी तालुक्यातील ११, चामोर्शी तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, आष्टी येथील लिटिल हार्ट इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांच्या कोरोना तपासणीत काही विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नववर्षाचा कार्यक्रम पडला महागात आष्टी येथील लिटिल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलमधील काही विद्यार्थ्यांना ताप असल्याने बुधवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २४ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे शाळा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. परिसरात पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर शाळेत १ जानेवारीला नवीन वर्षाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये बाहेरगावचे माजी विद्यार्थीसुद्धा उपस्थित होते. दिवसभर विविध कार्यक्रम सुरू होते. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना ताप आला. त्यामुळे बुधवारी सकाळी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात १३१ विद्यार्थ्यांची अँटिजन टेस्ट केल्यानंतर २४ विद्यार्थ्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यामध्ये वर्ग ७ ते ११ वीचे विद्यार्थी आहेत. यातील शाळेच्या हॉस्टेलचे विद्यार्थी जास्त आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना गडचिरोली येथे उपचारासाठी नेणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बिधान देवरी यांनी सांगितले.
शाळा सुरू ठेवण्याबाबत आज चर्चा- कोरोनाचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा बंद होतील का, अशी चिंता अनेक पालकांना आहे. काहींना कोरोनाची भीती आहे, तर काहींना शाळा बंद होईल तर मुलांचे पुन्हा शैक्षणिक नुकसान होईल, असे वाटते. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली जाईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.- दरम्यान आष्टीत ज्या शाळेत काेराेनाचे रुग्ण आढळले त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही काेराेना तपासणी केली जाणार आहे.