गडचिरोली : वेळेत धानाची भरडाई होत नसल्यामुळे यावर्षीही तब्बल पाच लाख क्विंटल धान उघड्यावरच पडून आहे. शासकीय गोदामेही धानाने तुडुंब भरलेली आहेत. भरडाईची अशीच स्थिती कायम राहिल्यास यावर्षी धान मोठ्या प्रमाणात खराब होऊन वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांकडील खरीप हंगामातील धानाची खरेदी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. पण धान ठेवायला जागाच नसल्यामुळे अनेक केंद्रांवरची खरेदी आधीच ठप्प पडल्याने बऱ्याच शेतकऱ्यांकडील धान विक्रीच्या प्रतीक्षेत पडून आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शासनाने धान खरेदीची मुदत आठवडाभर वाढवून दिली आहे. वास्तविक ही मुदतही पुरेशी नाही. पण शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी गोदामच नाही तर उघड्यावरही जागा शिल्लक नसल्यामुळे धान खरेदी बंद करावी लागत आहे. धानाच्या भरडाईला गती दिल्यास शेतकऱ्यांची अडचण दूर होऊन धान खरेदीलाही वेग येऊ शकतो.
यावर्षी आदिवासी विकास महामंडळाने ५६ केंद्रांवरून ८ लाख ६२४ क्विंटल धान खरेदी केला. त्यातून केवळ ७० हजार क्विंटल धान भरडाईसाठी राईस मिलर्सकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे महामंडळाकडे २ लाख ३२ हजार क्विंटल धान ३४ गोदामांमध्ये तर ४ लाख ९८ हजार क्विंटल धान खरेदी केंद्रांच्या आवारातच उघड्यावर पडून आहे.
१११ कोटींचे चुकारे बाकी
३१ जानेवारीपर्यंत आदिवासी विकास महामंडळाने २ लाख २६ हजार ६५० क्विंटल धानापोटी ७ हजार ४५८ शेतकऱ्यांना ४३ कोटी ९७ लाखांचे चुकारे वाटले आहेत. पण उर्वरित ५ लाख ७३ हजार ९३७ क्विंटल धानासाठी १११ कोटी ३५ लाख रुपयांचे चुकारे अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. आता ८ फेब्रुवारीपर्यत धान खरेदी सुरू राहणार असल्यामुळे थकीत चुकाऱ्याची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.