आरमोरी : दीड वर्षांपासून शाळा बंद असतानाही ट्यूशन फी व्यतिरिक्त संगणक शुल्क, वाचनालय शुल्क, अक्टिव्हिटी शुल्क असे अनेक प्रकारचे शुल्क इंग्रजी माध्यमाच्या शाळा पालकांकडून वसूल करीत आहेत. शालेय संसाधनांचा वापर होत नसताना आकारलेली फी ही निश्चितच आगावू आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील शालेय शुल्कात ५० टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी प्रहार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
इतर काही जिल्ह्यात शुल्कात सूट मिळू शकते तर गडचिरोली जिल्ह्यात ५० टक्के सुट का मिळू नये, असा पालकांचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे निखील धार्मिक, अक्षय भोयर, प्रशांत बाळेकरमरकर, नीलेश चन्नावार या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली.
बाॅक्स
शाळांकडून तगादा
कोरोनाच्या काळात काही पालकांच्या नोकऱ्या गेल्या,काहींचे व्यवसाय बुडाले अशा बिकट परिस्थितीत शालेय प्रशासनाकडून पूर्ण शुल्क भरण्यासाठी लावलेला तगादा निश्चितच मानसिक त्रास निर्माण करणारा आहे. पाल्यांना ऑनलाईन क्लासमधून काढण्यात येईल, अशी धमकी दिली जात आहे. त्यामुळे ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.