आमदार स्थानिक निधीतून : पाणीटंचाईची समस्या मार्गी लागणारअहेरी : तालुक्यात व अहेरी नगर पंचायतीच्या भागात पाणीपुरवठ्याच्या पुरेशा सोयी नसल्याने दरवर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवत होती. याची दखल घेऊन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या स्थानिक आमदार निधीतून सन २०१५-१६ या वर्षाच्या अखेरीस ५० लाख रूपये किंमतीच्या एकूण ५० हातपंपाचे काम मंजूर केले आहे. या कामांना सुरुवात झाली असल्याने आता अहेरी भागातील पाणीटंचाईची समस्या मार्गी लागणार आहे. अहेरीनजीकच्या गडअहेरी व गडबामणी येथे गुरूवारी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते हातपंप कामाचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेलीवार, अहेरी नगर पंचायतीचे सभापती नारायण सिडाम, पप्पू मद्दीवार, संतोष पडालवार, सागर डेकाटे, राजेश तोंबर्लावार, पोशालू चुधरी, सुकुमल हलदर आदी उपस्थित होते.सन २०१५-१६ या वर्षाच्या उन्हाळ्यात तापमानाने कहर केला होता. परिणामी अहेरी भागातील नदी, नाले, विहीर, तलाव, बोड्या आदींसह सर्वच पाणीस्त्रोताची पाण्याची पातळी खालावली होती. याचवेळी दौऱ्यादरम्यान या भागातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या निदर्शनास आला. तसेच यावेळी पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी हातपंप मंजूर करण्यात यावे, अशी मागणी गावातील नागरिक पालकंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर पालकमंत्री आत्राम यांनी आपल्या आमदार स्थानिक निधीतून प्रत्येकी १ लाख रूपये याप्रमाणे ५० लाख रूपयांतून ५० हातपंप मंजूर केले. हातपंप कामाच्या शुभारंभाप्रसंगी भाजपच्या कार्यकर्त्यांसह गडअहेरी व गडबामणी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान नागरिकांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे आभार मानून हातपंप मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)
५० लाखांतून ५० हातपंप मंजूर
By admin | Published: July 08, 2016 1:33 AM