राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी १४ जुलै राेजी पत्र काढून जिल्हा परिषदेंतर्गत वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश जि.प. प्रशासनाने दिले. त्यानुसार गडचिराेली जिल्हा परिषदेच्या वतीने संवर्गनिहाय विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. विभागनिहाय ही बदली प्रक्रिया २७ ते ३१ जुलै २०२१ यादरम्यान हाेणार आहे.
बाॅक्स ...
पारदर्शकपणे हाेणार प्रक्रिया
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची ही सर्वसाधारण बदली प्रक्रिया पारदर्शकपणे हाेणार असून, जि.प. च्या राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमाके सभागृहात समुपदेशनाने बदल्यांची कार्यवाही पार पाडण्यात येणार आहे, अशी माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. या बदली प्रक्रियेकरिता बदलीपात्र कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय अंतिम सेवाज्येष्ठता यादी जि.प.च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी वेळापत्रकानुसार बदली प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सीईओ आशीर्वाद यांनी केले आहे.
बाॅक्स....
...असे आहे वेळापत्रक
२७ जुलै राेजी सामान्य प्रशासन व वित्त विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेणार आहेत. २८ जुलैला महिला व बालकल्याण, सिंचन, बांधकाम, पशुसंवर्धन व कृषी आदी पाच विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या हाेतील. २९ जुलैला आराेग्य विभागातील आराेग्यसेवक महिला व पुरुष, यांत्रिकी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, तसेच ३० जुलै राेजी आराेग्य विभागातील आराेग्य सहायक, औषधनिर्माण अधिकारी, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ व आराेग्य पर्यवेक्षकांच्या बदल्या हाेणार आहेत. याशिवाय ३१ जुलै राेजी पंचायत विभाग, तसेच शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी आदींच्या बदल्या हाेणार आहेत.
बाॅक्स ...
संचमान्यतेत अडकल्या माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या
गडचिराेली जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हाभरात १० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये अनेक माध्यमिक शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, या शाळांची संच मान्यता न झाल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक सहायक शिक्षकांच्या बदल्या हाेणार नाहीत. पूर्वी शासकीय माध्यमिक शाळांची संचमान्यता दरवर्षी केली जात हाेती. मात्र, आता शासनाच्या वतीने चार ते पाच वर्षांनी संचमान्यता केली जाते. गतवर्षी सन २०१९-२० मध्ये संचमान्यतेअभावी माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. याहीवर्षी बदल्या रखडल्या आहेत. परिणामी, अहेरी उपविभागातील शिक्षक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.