गडचिरोली : अहेरी तालुक्यातील येरमणार येथे मुक्तिपथ तालुका चमूद्वारा सघन बैठक शुक्रवारी घेण्यात आली. त्याअनुषंगाने आयोजित गाव सभेमध्ये अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सोबतच गावामध्ये दारूविक्री केल्यास ५० हजार रुपये दंड, दारू पिऊन भांडण केल्यास १० हजार, जुगार खेळणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंड ठोठावून तो वसूल करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले.
येरमणार येथील गाव सभेमध्ये महिलांचा अधिक सहभाग होता. यावेळी गावातील दारू विक्रीवर चर्चा घडवून आणली व गावात आजपासून कोणी दारू विक्री करणार नाही हा निर्णय सर्वानुमते गावकऱ्यांनीच घेतला. दंड दिला नाही तर त्यांच्यावर पोलिस कारवाई तसेच ग्रामपंचायतीच्या योजनांचा लाभ मिळणार नाही. गावामध्ये पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंड ठोठावून तो वसूल करण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये झाला.
तपासणीद्वारे दारू व सडवा केला जप्त
गाव सभेनंतर गावामध्ये दारूबंदी विरोधात रॅली काढली व दारू विक्रेत्यांच्या घरांची तपासणी करून अहिंसक कृती केली. अहिंसक कृतीदरम्यान ७ लिटर मोहाची दारू व ४ हंडे मोहाचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. सभेला सरपंच संध्या मडावी, उपसरपंच व पेसा अध्यक्ष विजय आत्राम, पोलिस पाटील डोलू मडावी, आशा वर्कर गौरूबाई गोवर्धन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.