बीएसएनएलमधील प्रकार : वेतनातून कपात केलेली रक्कमही मिळाली नाही नगर प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : बीएसएनएलमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या सुमारे ५१ कर्मचाऱ्यांना मे. एस. आर. प्रसाद या कंपनीने सप्टेंबर २०१४ ते जानेवारी २०१६ या कालावधीतील ईपीएफची रक्कम दिली नाही. याबाबत कर्मचाऱ्यांनी खासदारांना निवेदन दिले आहे. मे. एस. आर. प्रसाद या कंपनीला सप्टेंबर २०१४ ते जानेवारी २०१६ या कालावधीत कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीच्या मार्फतीने बीएसएनएल कार्यालय गडचिरोली येथे सुमारे ५१ कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर विविध कामे करीत होती. ईपीएफच्या नियमानुसार महिन्याचे हजार रूपये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करून तेवढीच रक्कम कंत्राटदाराने ईपीएफच्या खात्यात भरणे आवश्यक आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांच्या मानधनातून एक हजार रूपयांची रक्कम कपात केली. मात्र ईपीएफची एकही रक्कम या कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली नाही. ५१ कर्मचाऱ्यांचे मासिक एक हजार रूपये प्रमाणे ५१ कर्मचाऱ्यांचे १६ महिन्यांचे ८ लाख १६ हजार रूपये मानधनातून कपात केले व तेवढीच रक्कम भरणे गरजेचे होते. मात्र कंत्राटदाराने रक्कम भरली नाही. ईपीएफची रक्कम जमा केल्याची खात्री केल्यानंतरच कंत्राटदाराचे पूर्ण बिल द्यावे, असा नियम आहे. मात्र गडचिरोली बीएसएनएल कार्यालयाने छोटे बिल वगळता संपूर्ण बिलाची रक्कम कंत्राटदाराला अदा केली आहे. ईपीएफची रक्कम मिळण्यासाठी कंत्राटदार, बीएसएनएलचे जिल्हा अभियंता, पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन ईपीएफ मिळवून देण्याची मागणी केली आहे.
ईपीएफपासून ५१ कर्मचारी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2017 1:29 AM