आॅनलाईन लोकमतगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाच्या १० जागांसाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील मिळून एकूण ३६ केंद्रांवरून मतदानाची प्रक्रिया रविवारी घेण्यात आली. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व केंद्र मिळून एकूण ५१.५२ टक्के मतदान झाल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सदर मतदानाची टक्केवारी प्राथमिक स्तरावरील अंदाजित असल्याचे सांगण्यात आले.गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघात एकूण ११ हजार १९ मतदार होते. यापैकी दोन्ही जिल्हे मिळून ५ हजार ६९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. एकूण ३६ केंद्रांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात २२ व गडचिरोली जिल्ह्यात १४ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. गडचिरोली येथील शिवाजी कला महाविद्यालयातील ६७४ पैकी ४४२ पदवीधरांनी मतदान केले. तर शासकीय विज्ञान महाविद्यालयातील ६२२ पैकी ३६४ मतदारांनी मतदान केले. अहेरी येथील मतदान केंद्रावर ३६४ पैकी २७० मतदारांनी मतदान केले. एकूण ७४ टक्के मतदान झाले. सिरोंचा केंद्रावर ६९ टक्के मतदान झाले. १०७ पैकी ७४ मतदारांनी मतदान केले. भामरागड तालुक्यात ९२ टक्के मतदान झाले. १२ पैकी ११ मतदारांनी मतदान केले. एटापल्ली येथे ६९ टक्के मतदान झाले. ७४ मतदारांपैकी ५१ मतदारांनी मतदान केले. मुलचेरा तालुक्यातील एकूण २९ मतदारांपैकी २० पदवीधरांनी मतदान केले. या ठिकाणी ६९ टक्के मतदान झाले.चामोर्शी मतदान केंद्रावर २४७ पैकी १८१ पदवीधरांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७३.२७ टक्के आहे. याच मतदान केंद्रावर दोन पैकी दोन प्राचार्य, तीन पैकी तीन व्यवस्थापन प्रतिनिधी, ११ पैकी ११ अध्यापक वर्ग व एक पैकी एक बोर्ड आॅफ स्टडीजच्या सदस्यांनी मतदान केले.पदवीधर मतदार संघात संस्थापक प्राचार्य व पदवीधर मतदारांचा समावेश होता. यावेळी मतदान केंद्रावर एका मतदाराला आठ ठिकाणी स्वाक्षºया कराव्या लागत होत्या. तसेच एका मतदाराला सहा मतपत्रिका दिल्या जात होत्या. त्यामुळे एका मतदाराला मतदान करून मतदान खोलीतून बाहेर पडण्यासाठी १० मिनिटांचा अवधी लागत होता. सदर लांबलचक प्रक्रियेमुळे अनेक पदवीधर मतदारांना तासन्तास रांगेत ताटकळत राहावे लागल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्याच्या विविध केंद्रांवर दिसून आले.बुधवारी निकालविद्यापीठाच्या निवडणुकीत विविध मतदार संघासाठी एकूण ४१ जागांकरिता ११७ उमेदवार रिंगणात होते. रविवारी ३६ केंद्रावरून मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी उशीरापर्यंत कर्मचारी मतपत्रिकेसह विद्यापीठात पोहोचले. या निवडणुकीची मतमोजणी १३ डिसेंबर रोजी बुधवारला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात होणार आहे. तोपर्यंत अंदाज काढणे सुरू आहे.
सिनेटसाठी ५१ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:08 AM
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाच्या १० जागांसाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील मिळून एकूण ३६ केंद्रांवरून मतदानाची प्रक्रिया रविवारी घेण्यात आली.
ठळक मुद्देबहुतांश केंद्रावर मतदारांच्या रांगा : गडचिरोली येथे रात्री उशीरापर्यंत चालले मतदान