७४ लाख रूपयांचा खर्च : नगर परिषदेतही २१ कॅमेऱ्यांची राहणार नजरगडचिरोली : गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी गडचिरोली शहरात २० ठिकाणी ५२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार करून नगर परिषदेने शासनाकडे सादर केला आहे. गडचिरोली शहराचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्हास्थळ असल्याने जिल्हाभरातील नागरिक विविध कामांसाठी गडचिरोली येथे येतात. त्यामुळे शहरात व मुख्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी राहते. जिल्हा निर्मिती होऊन ३० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी गडचिरोली शहरातील एकाही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला नाही. दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींपर्यंत पोहोचने पोलिसांना अशक्य होते. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली नगर परिषदेने सीसीटीव्ही लावण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला. सदर प्रस्ताव तयार केला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी ७३ लाख ९८ हजार रूपयांचा खर्च येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लागल्यानंतर शहरातील गैरकृत्यांना आळा बसण्यास फार मोठी मदत होणार आहे. गांधी चौकात नेहमीच अपघात होतात. मात्र अपघात झाल्यानंतर वाहनधारक फरार होतात. मात्र सीसीटीव्हीमुळे अपघात करणाऱ्या वाहनाला पळ काढणे शक्य होणार नाही. नगर परिषद कार्यालयातही २१ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सुद्धा पाच कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आहेत. सदस्य म्हणूून जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी डीपीओ गजानन भोयर, मुख्याधिकारी कृष्णा निपाने, ठाणेदार विजय पुराणिक, वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक अमृता राजपूत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, एसडीपीओ सागर कवडे यांचा समावेश आहे. (नगर प्रतिनिधी)या ठिकाणी लागणार कॅमेरेशहरातील इंदिरा गांधी चौक, कारगील चौक, आयटीआय चौक, जिल्हा न्यायालय, जिल्हा रुग्णालय, हनुमान चौक, अरूण इलेक्ट्रिकल्स, गांधी चौक, स्टेट बँक आॅफ इंडिया, बसस्थानक, पोटेगाव टी-पार्इंट, चामोर्शी मार्ग बसस्थानक, रेड्डी गोडाऊन चौक, सेमाना मंदिर परिसर, विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्ती चौक, एसबीआय बिल्डिंग टॉवर, नगर परिषद टॉवर, पोस्ट आॅफिस, पोलीस स्टेशन, कॉम्प्लेक्स एरिया या २० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.
गडचिरोली शहरात लागणार ५२ सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2017 12:50 AM