जुलै महिन्यात लावणार रोपटे : शासनाकडून वन विकास महामंडळाला सर्वाधिक उद्दिष्टलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाने १ ते ३१ जुलै या कालावधील राज्यभरात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले. त्यात गडचिरोली जिल्ह्यात वन विभाग व इतर यंत्रणांना सुमारे ५० लाख ७३ हजार वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार ५१ लाख ९५ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन असून तेवढी वृक्ष लागवड होणार आहे.वाढती लोकसंख्या, उद्योग, शेतीचा विस्तार, सिंचन व इतर प्रकल्प यामुळे मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. जंगल तोडीमुळे जगाला तापमानातील वाढ, हवामानात बदल व ऋतू बदलाचे परिणाम आताच दिसायला लागले आहेत. हे सर्व दृष्परिणाम टाळण्यासाठी राज्य शासनाने २०१७ ते २०१९ या कालावधीत ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी ४ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावर्षी १३ कोटी तर पुढील वर्षी ३३ कोटी वृक्षांची राज्यभरात लागवड होणार आहे.वृक्ष लागवड व त्यांची जोपासणा करण्याची यंत्रणा वनविभागाकडे असल्याने वृक्ष लागवडीचे नियोजन करण्याचे काम वन विभागाकडे सोपविण्यात आले आहे. यावर्षी गडचिरोली वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग व एफडीसीएम ४५ लाख ४ हजार वृक्षांची लागवड करणार आहे. इतर विभाग १ लाख ९१ हजार व ग्रामपंचायती ५ लाख वृक्षांची लागवड करणार आहेत. प्रत्येक ग्रा.पं.ला १ हजार ९९१ वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.एफ डीसीएम १४ लाख ७८ हजार वृक्षांची लागवड करणार आहे. यामध्ये १४ लाख सागाची रोपटे तर २१ हजार बांबू वृक्षांचा समावेश आहे. मागील वर्षी १ ते ७ जुलै या कालावधीतच वृक्ष लागवड करायची होती. यावर्षी मात्र गतवर्षी पेक्षा उद्दिष्ट वाढल्याने वृक्ष लागवडीचा कालावधीसुद्धा वाढवून देण्यात आला आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत वृक्ष लागवड करता येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी आता केवळ एक महिण्याचा कालावधी शिल्लक असल्याने वन विभागासह इतर विभागांनी खड्डे खोदून वृक्ष लावण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात वन विभागाची सर्वाधिक जमीन असल्याने वक्ष लागवडीचे सर्वाधिक लक्ष्य गडचिरोली जिल्हा वन विभागाला दिले आहे. २०१६ मध्ये दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणारे महाराष्टÑ हे देशातील पहिले राज्य ठरल्याने या उपक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. अशा प्रकारचा उपक्रम इतरही राज्यांनी राबवावा असा सल्लाही दिला. त्याचबरोबर या उपक्रमाची लिम्का बूक आॅफ रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद होऊन राज्य शासनास प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते.
वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती गरजेचीवातावरणातील बदलामुळे वृक्षांचे महत्त्व नागरिकांना कळायला लागले आहे. त्यामुळे राज्यशासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत व इतरही सामाजिक उपक्रमांच्यावेळी वृक्ष लागवड केली जात आहे. हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र लावलेल्या रोपट्याकडे दुसऱ्याच क्षणी दुर्लक्ष केले जाते ही अतीशय चिंतेची बाब आहे. रोपट्याची लागवड केल्यानंतर पावसात काही दिवसांचा खंड पडला तर त्याला पाणी देणे आवश्यक आहे. तसेच कठडा लावून त्याचे जनावरांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. मात्र असे होताना दिसत नाही. त्यामुळे लावलेला रोपटा जनावरांकडून दुसºयाच दिवशी फस्त केला जातो.रोपटे जगण्यासाठी उन्हाळ्यात पाणी देणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड योजनेंतर्गत पाणी देण्याची आर्थिक तरतूद नसल्याचे कारण पुढे करून विविध विभाग पाण्याची व्यवस्था करीत नाही. त्यामुळे हिवाळ्यापर्यंत जगलेले झाड उन्हाळ्यात करपते. दुसºयावर्षी पुन्हा त्याच खड्ड्यात रोपटे लावून शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले जाते. आघाडी शासनाच्या कालावधीपासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जात आहे. तेव्हापासून लावलेले किमान २५ टक्केही वृक्ष जगले असते तर राज्यातील संपूर्ण रस्ते व शिवार हिरवेगार झाले असते. हा सर्व अनुभव लक्षात घेता वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संवर्धनाबाबतही जनजागृतीची गरज आहे.