गडचिरोली : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता १ ते ५ वी हा प्राथमिक व ६ ते ८ वी हा उच्च प्राथमिक शिक्षणस्तर ठरविला असून या शैक्षणिकस्तराला मान्यता दिली आहे. या शैक्षणिकस्तराची अंमलबजावणी करण्याबाबतचे शिक्षण आयुक्ताचे पत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना प्राप्त झाले असल्याने गडचिरोली तालुक्यात इयत्ता ५ वी चे ४८ व ८ वी चे ६ असे एकूण ५४ नवे वर्ग होणार आहेत. गडचिरोली तालुक्यात इयत्ता ४ थी चे ६0 व ७ वी चे ४४ जुने वर्ग असल्याची माहिती गडचिरोली पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मठपती यांनी केली आहे. नवे वर्ग सुरू करण्यासाठी पंचायत समितीचा शिक्षण विभाग तसेच केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. गडचिरोली तालुक्यात नवे ५४ वर्ग यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून सुरू होणार असल्याने खासगी अनुदानित तसेच विनाअनुदानित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना विद्यार्थी मिळण्यास अडचण जाणार आहे. यामुळे तालुक्यातील अनेक खासगी संस्थांनी आपल्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे करीत असल्याची माहिती आहे. खासगी शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांंसाठी दारोदारी फिरत असल्याचे दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
४ थी व ८ वीचे ५४ नवे वर्ग
By admin | Published: May 24, 2014 11:38 PM