भामरागड माघारला : ४६.३९ टक्के कुटुंबांकडे शौचालयदिलीप दहेलकर - गडचिरोलीउघड्यावर शौचालयास गेल्याने विविध आजार होत असल्याचे आरोग्य संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे शासनाच्यावतीने अनुदानावर ग्रामीण भागात शौचालय बांधकामाचा निर्णय घेण्यात आला. निर्मल भारत अभियानातून जिल्हा परिषदेच्यावतीने शौचालय बांधकामाची मोहीम सुरू आहे. सध्य:स्थितीत जिल्ह्यातील ४६.३९ कुटुंबाकडे शौचालय आहेत. तर ५४.६१ टक्के कुटुंब जिल्हा निर्मितीच्या ३० वर्षानंतरही शौचालयाविना असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. परिणामी जिल्ह्यात गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे.निर्मल भारत अभियानातून जिल्हा परिषदेला गतवर्षी २०१३-१४ मध्ये शासनाने ८ हजार ५०० वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी ८ हजार ५०० शौचालय बांधकाम पूर्ण झाले आहे. गेल्या ३-४ वर्षांपासून अनुदानावर शौचालय बांधकामाचा कार्यक्रम जिल्ह्यात सुरू आहे. शासनाने २०१४-१५ या वर्षाकरिता निर्मल भारत अभियानातून जिल्ह्याला १५ हजार ७०० शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले आहे. सदर शौचालय जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या गावात बांधण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती असून एकूण कुटुंबांची संख्या २ लाख २८ हजार ९३ आहे. यापैकी १ लाख ५ हजार ८२८ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय आहे. तर सध्य:स्थितीत १ लाख २२ हजार २६३ कुटुंबांकडे शौचालय नाही. शौचालय नसलेल्या कुटुंबांची टक्केवारी ४६.३९ आहे. केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागात १०० टक्के शौचालय उभारून गोदरीमुक्त राज्य व देश करण्याचा संकल्प आहे. शौचालयाच्या योजनांबाबत व वापराबाबत अद्यापही गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक पुरूष व महिला उघड्यावर शौचालयास जात असल्याचे दिसून येत आहे. खुल्या जागेत शौचालयास बसण्याचे प्रमाण वाढल्यामुळे जिल्ह्यात विविध प्रकारच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ‘घर तेथे शौचालय’ ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे.
५४ टक्के कुटुंब शौचालयाविना
By admin | Published: November 11, 2014 10:39 PM