दिगांबर जवादे गडचिरोलीप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १४ वर्षांच्या कालावधीत सुमारे ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले असून त्यावर १९७ कोटी ७५ लाख २९ हजार रूपये खर्च झाले आहेत. देशातील प्रत्येक गाव बारमाही रस्त्याने जोडण्याच्या उद्देशाने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००० साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ५०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे जोडण्याचे उद्दिष्ट या योजनेंतर्गत देण्यात आले. आदिवासी भागासाठी यामध्ये थोडी शिथीलता देऊन ही अट २५० पेक्षा अधिक लोकसंख्या ऐवढी ठेवण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात या योजनेच्या कामाला २००० पासून सुरूवात झाली. सध्य:स्थितीत या योजनेचा दहावा टप्पा सुरू आहे. पहिला व दुसरा टप्पा जिल्हा परिषदेच्या मार्फतीने राबविण्यात आला. सन २००६-०७ मध्ये ही योजना राबविण्यासाठी ग्रामीण रस्ते विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. तर २००९ पासून यासाठी स्वतंत्र कार्यकारी यंत्रणा स्थापन करण्यात आली व या यंत्रणेच्या मार्फतीने सध्या या योजनेचे काम सुरू आहे. २००० ते २०१४ या कालावधीपर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत २३३ कामांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी १८१ कामे पूर्ण झाली आहेत. तर ३८ कामे प्रगतीपथावर आहेत. विविध कारणांमुळे १४ कामे नियोजनातून वगळण्यात आली आहेत. यातून १०७४.३२ किमीचे रस्ते बांधण्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी प्रत्यक्षात ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. यातून गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावे रस्त्यांनी जोडण्यास मदत झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात २५० पेक्षा कमी लोकसंख्या असलेली अनेक गावे आहेत. देशातील सर्वच गावे रस्त्यांनी जोडण्यासाठी सदर योजनेची सुरूवात करण्यात आली असली तरी गडचिरोली जिल्ह्यातील २९९ गावे अजूनही बारमाही रस्त्यांनी जोडण्यात आली नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात या गावांचा संपर्क तुटत असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
१० वर्षात ६९७ किमी लांबीच्या रस्त्यांची निर्मिती
By admin | Published: November 22, 2014 1:18 AM