गडचिराेली : यूपीएससी परीक्षेप्रमाणे एमपीएससी परीक्षा देण्याच्या संधीवरही महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने बंधने घातली आहेत. याबाबत एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, आयाेगाचा हा निर्णय याेग्य असल्याचे सांगितले आहे.
यापूर्वी एमपीएससीची परीक्षा कितीही वेळा देता येत हाेती. मात्र ३० डिसेंबर राेजी महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला आता केवळ सहा संधी तर इतर मागास वर्गासह अन्य मागास प्रवर्गांना कमाल ९ संधी दिल्या आहेत. मात्र यातून अनुसूचित जमाती व जातीच्या उमेदवारांना वगळण्यात आले आहे. त्यांना पूर्वीप्रमाणेच कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. हा नियम यापुढे जाहिरात प्रसिध्द हाेणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी लागू हाेणार आहे. उमेदवाराने पूर्वपरीक्षेचा एक जरी पेपर दिला तरी त्याने एमपीएससीची परीक्षा दिली असे समजून त्याची एक संधी कमी केली जाणार आहे.
बाॅक्स
अशाप्रकारे होईल संधीची गणना
एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.
बेराेजगारांना नाेकरी मिळेल
एमपीएससीची परीक्षा देण्यावर काेणतीही बंधने नसल्याने शासकीय नाेकरी असलेले अधिकारी पुन्हा माेठ्या पदांसाठी अभ्यास करत राहत हाेते. ते ना धड नाेकरी ना अभ्यास करीत हाेते. त्यामुळे त्यांना जास्त संधीची गरज भासत हाेती. आता मात्र परीक्षा देण्यावर बंधने घातल्याने त्यांचा पत्ता कट हाेऊन बेराेजगार युवकांना नाेकरीची संधी मिळेल.
काेट
नाेकरीसाठी ९ संधी पुरेशा आहेत
ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला ९ वेळा एमपीएससी देण्याची संधी देण्यात आली आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एवढ्या संधी पुरेशा आहेत. संधी मर्यादित असल्याने विद्यार्थी जाेमाने अभ्यास करेल. आधीच नाेकरी असलेल्या अधिकाऱ्यांना मात्र या संधी अपुऱ्या पडण्याची शक्यता आहे.
-प्रतीक वासेकर, उमेदवार
यशस्वी न झाल्यास दुसरा राेजगार शाेधेल
उमेदवाराला लिमिटेड संधी असल्याने या कालावधीत ताे एपीएससीच्या तयारीसाठी स्वत:ला झाेकून घेईल. तरीही नाेकरी न मिळाल्यास अधिकारी बनण्याचे स्वप्न मनातून पूर्णपणे काढून टाकून ताे इतर राेजगाराकडे वळेल व त्या राेजगारात स्वत:ला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल.
-कुणाल बगाटे, उमेदवार
नाेकरीसाठी स्वत:ला वाहून घेतील
एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी मर्यादित संधी आहेत. याची जाणीव युवकाला राहील. त्यामुळे ठरलेल्या कालावधीत नाेकरी मिळावी, यासाठी ताे स्वत:ला वाहून घेईल. केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे, असे म्हणता येईल.
-कल्याणकुमार लाडे, उमेदवार