गडचिरोली : मिरची तोडण्यासाठी नदीपात्रातून जाताना मजूर महिलांच्या दोन नावा बुडाल्याची घटना गणपूर (ता. चामोर्शी) येथील वैनगंगा नदीपात्रात मंगळवारी सकाळी घडली. एक नाव नदीकाठाजवळ उलटल्याने आठ जण सुखरूप वाचले, दुसऱ्या नावेतील आठ जण बुडाले. त्यातील ६ जणांना जलसमाधी मिळाली. त्यापैकी दोघींचे मृतदेह सापडले. नदीकाठी नातेवाइकांचा आक्रोश होता, गावकरी सुन्न झाले होते. सायंकाळच्या पावसामुळे बचावकार्यातही अडथळा आला होता.
का घडली दुर्घटना? वैनगंगा नदीत २२ जानेवारीला अचानक चिचडोह प्रकल्पाचे पाणी सोडले. त्यामुळे पाण्याची पातळीही वाढली. त्याचा अंदाज न आल्याने नाव उलटली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पाणी सोडण्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक होते, पण ती न दिल्याने ही घटना घडली, असा आरोप स्थानिकांनी केला.
यांना जलसमाधीजिजाबाई दादाजी राऊत (५५), पुष्पा मुक्तेश्वर झाडे (४२), रेवंता हरिश्चंद्र झाडे (४२), मायाबाई अशोक राऊत (४५), सुषमा सचिन राऊत (२२), बुधाबाई देवाजी राऊत (६५). मायाबाई व सुषमा या सासू-सून आहेत.