जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसर जंगलव्याप्त परिसर म्हणून परिचित आहे. या जंगलव्याप्त परिसरात जवळपास ६० गावांचा समावेश आहे. परंतु या गावांमध्ये वीज, पाणी, शिक्षण, रस्ते आदी मूलभूत समस्यांची भरमार असल्याने या परिसराचा विकास खुंटत चालला आहे. त्यामुळे या परिसरातील समस्या त्वरित मार्गी लावाव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जिमलगट्टा परिसरातील नागरिकांना १०० किमीचा प्रवास करुन कार्यालयीन कामाकरिता तालुका मुख्यालयात जावे लागत आहे. त्यामुळे या कामासाठी नागरिकांचा २ ते ३ दिवसांचा कालावधी लागत आहे. काम करण्यासाठी दिरंगाई तर होतच आहे शिवाय परिसरातील नागरिकांना आथिक व मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. शासनाने जिमलगट्टा परिसरातील समस्या सोडविण्याकडे लक्ष घालावे. या परिसराचा विकास साधण्यासाठी जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर असलेल्या देचलीपेठा परिसरातील १५ ते २० गावांचा अद्यापही विकास झाला नाही. जंगलवाटेनेच नागरिकांना जावे लागत आहे. अतिदुर्गम गावातील शाळांमध्ये शिक्षक हजर राहत नसल्याचे अनेकदा दिसून येत आहे. सदर गाव अतिदुर्गम भागात असल्याने येथे वरिष्ठ अधिकारीही वेळेवर पोहोचत नाही. नियमित दौरे करण्याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
जिमलगट्टा परिसरातील ६० गावे विकासाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: November 02, 2014 10:35 PM